मुंबई: केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) क्रूझ पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा जबाब एनसीबीच्या दक्षता पथकाने नोंदवला. साईल यांनी याप्रकरणी पैशांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. याशिवाय एनसीबीचे पथकाने लोअर परळ, क्रूझ टर्मिनससह आदी ठिकाणांना भेट देऊन घटनास्थळांची पाहणी केली.

एनसीबीच्या दक्षता पथकाने याप्रकरणी रविवारी साईल यांना समन्स बजावले होते त्यानुसार सोमवारी साईल वांद्रे येथील सीआरपीएफ मेस येथे एनसीबीच्या दक्षता पथकासमोर हजर झाले. पाच तासांहून अधिक काळ या दक्षता पथकाने त्याचा जबाब नोंदवला.

एनसीबीच्या दक्षता पथकाने लोअर परळ, इंडियाना हॉटेल येथे भेट दिली. या ठिकाणी के.पी. गोसावी व शाहरुखची व्यवस्थापक पूजा ददलानी भेटल्याचा आरोप आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस येथेही या पथकाने भेट दिली. एनसीबीचे महासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाचसदस्यीय पथक पंच प्रभाकर साईलने केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांबाबत तपास करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील ८ कोटी रुपये अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप एनसीबीचे पंच प्रभाकर साईलने केला होता.