मुंबई : बेस्ट उपक्रमातील स्वमालकीच्या बसची संख्या सुमारे ४१८ झाली असून पुढील महिन्यात स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या आणखी रोडावण्याची चिन्हे आहेत. तसेच बेस्टच्या ताफ्यातील अनेक बसगाड्या नादुरूस्त असून याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. सीएसएमटी – नरिमन पाॅइंट दरम्यानच्या प्रवासात प्रवाशांचा प्रचंड खोळंबा होत आहे. प्रवास कालावधीपेक्षा बस थांब्यावर अधिक वेळ वाया जात असल्याने नोकरदारांची प्रचंड गैरसोय होत आहे.
नरिमन पाॅंइट परिसरात सरकारी कार्यालय, बँका, निमसरकारी कार्यालये, खासगी कार्यालये असल्याने या मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. परंतु, प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यामुळे बेस्ट बस मार्ग ११५ वरील प्रत्येक बस थांब्यावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. १५ ते २० मिनिटे बस येत नसल्याने बस थांब्यावर प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागलेल्या असतात. तर, दुपारच्या सुमारास ३० ते ४५ मिनिटांनी बसची एकही फेरी धावत असून, प्रवाशांना बराच वेळ पावसात उभे राहून बसची वाट पाहावी लागते.
मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांवर बसची वारंवारता कमी झाल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. मुंबईतील बहुतांश ठिकाणी बेस्टचे मोठे प्रशस्त बस थांबे नाहीत. तसेच दुपारच्या सुमारास कमी फेऱ्या धावत असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते.
वेळापत्रकानुसार दर दोन ते तीन मिनिटांनी बस
सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणाऱ्या बेस्ट बस मार्ग क्रमांक ए- ११५ मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात विलंबयातना सहन कराव्या लागत आहेत. वेळापत्रकात मात्र दर दोन ते तीन मिनिटांनी बस दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र बसची वारंवारिता कमी झाली आहे.
सीएसएमटी – नरिमन पॉईंट बेस्टचा प्रवास वेळखाऊ
मुंबईतील रस्ते मार्गावरील जीवनवाहिनी म्हणून बेस्टकडे पाहिले जाते. मात्र बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील बसची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे बेस्टची सेवा संपूर्ण मुंबईकरांना अपुरी पडत आहेत. त्यामुळे बेस्ट प्रवाशांना वेळेत बस मिळत नाही. सीएसएमटी – नरिमन पॉइंट दरम्यानचा प्रवास वेळखाऊ झाल्याने प्रवासी प्रचंड हैराण झाले आहेत.
नादुरूस्त बसमुळे त्रास
बेस्ट उपक्रमातील बस मार्ग १०८, ए-१११, ए-११५, ए-१३८ हे चार मार्ग सीएसएमटी ते नरिमन पॉइंटदरम्यान धावतात. गेल्यावर्षीही हेच मार्ग सुरू होते. परंतु, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बस फेऱ्यांची वारंवारता कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना विलंबयातना सहन कराव्या लागतात. १२ जून रोजीपासून ६ बस आणि २१ ऑगस्ट पर्यंत १४ बस आरटीओ पासिंगसाठी गेल्या आहेत. तसेच ४ बस नादुरूस्त असल्याने सीएसएमटी बस स्थानकात प्रवाशांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागत आहेत.
इतर मार्गावरील बस गर्दीच्या ठिकाणी
सीएसएमटी येथील गर्दीची अद्ययावत माहिती घेण्यासाठी बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सीएसएमटी येथे प्रवाशांची गर्दी होत असल्यामुळे शिवाजी नगर आगार, मुंबई सेंट्रल आगार, वरळी आगार, बॅकबे आगार येथून १८ बस चालविण्यात येतात. तसेच बॅकबे आगारातून दोन बस बसमार्ग ए-१११ फ्री प्रेस जनरल या मार्गावर वळवण्यात येत आहेत. या ठिकाणी अधिक गर्दी झाल्यास इतर मार्गावरील बस या मार्गावर परावर्तित करण्यात येत आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली.