मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने ७/११ लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष ठरविल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या भीषण दहशतवादी हल्ल्यातून वाचलेल्या पीडितांनी हा निर्णय सरकार आणि तपास यंत्रणेचे एकत्रित अपयश असल्याचे म्हटले आहे. या स्फोटातील खऱ्या गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी ७ साखळी स्फोट घडविण्यात आले. या स्फोटांत १८० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक नागरिक जखमी झाले होते. सोमवारी १९ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. यापूर्वी दोषी ठरविण्यात आलेल्या सर्व १२ आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले. या निर्णयावर स्फोटातून बचावलेल्या पीडितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सरकार आणि तपास यंत्रणेचे अपयश

सनदी लेखापाल असलेले चिराग चौहान, हे स्फोट झाला तेव्हा २१ वर्षांचे होते आणि सनदी लेखापालाचे शिक्षण घेत होते. खार आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान त्यांच्या लोकलमध्ये स्फोट झाला. त्यात त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर इजा झाली. त्यांना अपंगत्व आले असून ते व्हील चेअरवर आहेत. ते आता ४० वर्षांचे असून त्यांनी सनदी लेखापालाचे शिक्षण पूर्ण केले आहे. हा निकाल सरकार, तपास पथक आणि न्याययंत्रणेचे एकत्रित अपयश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन योग्य न्याय किंवा तपासाची मागणी केली पाहिजे. जे या साखळी स्फोटांना जबाबदार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे ते म्हणाले.

समिती नेमून लवकर शिक्षा द्यावी

पश्चिम रेल्वेचे कर्मचारी असलेले महेंद्र पितळे (५२) यांनी जोगेश्वरी जवळ झालेल्या स्फोटात आपला डावा हात गमावला आहे. मी उच्च न्यायालयाच्या निकालाशी सहमत नाही. स्फोटाच्या १९ वर्षांनंतर असा निकाल येणे खूप निराशाजनक आहे, असे पितळे म्हणाले. सरकारने सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून न्याय मिळवावा अशी मागणी त्यांनी केली. सरकारने एक समिती नेमावी आणि सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर अपील करावे. आरोपींना शक्य तितक्या लवकर शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

हंसराज कनोजिया यांनी या स्फोटात आपला उजवा पाय गमावला आहे. उच्च न्यायालयाचा निकाल फारच दुःखद वाटत असल्याचे कनोजिया यांनी सांगितले. या स्फोटामागील खरे गुन्हेगार शोधून त्यांना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कनोजिया लोकल ट्रेनमधील द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करीत होते. जोगेश्वरी स्थानकाजवळ ट्रेनमधील प्रथम श्रेणीच्या डब्यात स्फोट झाला, त्यात जे जखमी झाले आणि त्यांना एक पाय गमवावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहशतवाद विरोधीत पथकाच्या तपासावर प्रश्नचिन्ह

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तपास यंत्रणेने दावा केला होता की आरोपी हे बंदी घातलेली संघटना स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचे (सिमी) सदस्य होते आणि त्यांनी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या सदस्यांबरोबर मिळून कट रचला होता. न्यायालयाने सरकारच्या या दाव्यावर ताशेरे ओढले. सर्व कबुलीजबाब अमान्य ठरवत संशय व्यक्त केला. आरोपींवर छळ करून हे कबुलीजबाब घेतले गेले, असेही न्यायालयाने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, सर्वोच्च न्यायालयात २४ जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.