मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीने निर्विवाद यश मिळविल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता लागली आहे. शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांची मुख्यमंत्रीपद निवड करावी, अशी मागणी करीत दबाव वाढविला आहे. दुसरीकडे, भाजप विधिमंडळ पक्षाची नेता निवडीसीठी बैठक येत्या एक-दोन दिवसांत होणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे, हा भाजप नेत्यांचा आग्रह आहे.

दोनतृतीयांश यश मिळाल्याने महायुतीत प्रचंड उत्साहाचे वातावरण असताना मुख्यमंत्री कोण होणार याची आता साऱ्यांनाच प्रतीक्षा आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची तर राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार व नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद कायम राहावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदी निवड करावी, अशी राष्ट्रवादीच्या आमदार व कार्यकर्त्यांची भावना आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच कायम राहावेत, अशी आमच्या पक्षातील सर्वांची भावना असल्याचे शिवसेना नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कायम ठेवावे, असाच शिवसेनेत सूर आहे. दुसरीकडे, अजित पवारांना संधी द्यावी, अशी राष्ट्रवादीत भावना आहे.

हेही वाचा >>> BJP : शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्याचा सर्वाधिक फायदा भाजपाला कसा झाला?

विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. फडणवीस हे नवी दिल्लीला जाण्याची शक्यता असून मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठींकडून निर्णय झाल्यावरच भाजप विधिमंडळ नेतानिवडीची बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दणदणीत विजयानंतर भाजपमध्येही उत्साही वातावरण असून मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील अनेक आमदारांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, अशी भावना या आमदारांनी बोलून दाखविली. महायुतीत दिवसभर नेतेमंडळींच्या गाठीभेटी सुरू होत्या. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही मुख्यमंत्री शिंदे तसेच फडणवीस यांची भेट घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिघांना दिल्लीत पाचारण?

भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटांत पडद्याआडून खलबते सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांना भाजपचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत पाचारण करण्याची शक्यता असून त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर चर्चा होईल, असे समजते. मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यायचे, याचा निर्णय झाल्यानंतरच भाजपची नेतानिवडीची बैठक पार पडेल, अशीही चर्चा आहे.