मुंबईः जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील महत्त्वाच्या संकेतस्थळांवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले आहे. त्याला भारतीय हॅकर्सनी प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानातील महत्त्वाच्या संकेतस्थळांवर सायबर प्रतिहल्ले झाल्याची माहिती उघड झाली आहे. “सायबर कमांडर.” या नावाखाली हे प्रतिहल्ले केल्याचा दावा करण्यात येत असून त्यात पाकिस्तानातील १५०० संकेतस्थळे हॅक करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या संकेतस्थळांवर हिंदुस्तान जिंदाबादचे संदेश अपलोड करण्यात आले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात १० लाखांहून अधिक हल्ले झाले असून त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबत सायबर विभागाकडून सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. “इकोज ऑफ पहलगाम” या सविस्तर अहवालानुसार, २३ एप्रिलपासून जवळपास १० लाख सायबर हल्ले नोंदवले गेले आहेत. एखाद्या हॅकरकडून हे हल्ले झालेले नसून त्यामागे एक गट असल्याचा संशय आहे. दहशतवाद्यांनी राबवलेल्या मोहिमेचा हा भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे फक्त हल्ले नसून संघटीत सायबर युद्धासारखी स्थिती असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

हे हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्वेतील देश, मोरोक्को आणि इंडोनेशिया या देशांतून होत आहेत. या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या अनेक हॅकर गटांनी स्वतःला विशेष नाव दिले आहे. त्यातील ‘टीम इन्सेन पीके’ हा पाकिस्तानस्थित गट सर्वाधिक सक्रिय आहे. त्याच्याकडून सर्वाधिक हल्ले होत असल्याचा संशय आहे. या गटाने भारतीय सैनिकी शिक्षण संस्थां, सैनिक कल्याण पोर्टल्सवर आणि अनेक सैनिकी शाळांच्या संकेस्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात राजस्थानमधील शिक्षण संस्थेचे संकेतस्थळ हॅक करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी हॅकर्सकडून करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून सायबर कमांडर हॅकर्स ग्रुपने पाकिस्तानातील १५०० संकेतस्थळे हॅक केली आहेत. “सायबर कमांडर” या नावाखाली हे प्रतिहल्ले केल्याचा दावा करण्यात येत असून, यात कराची, खैबर पख्तूनख्वा, मुलतान, पेशावर, फैसलाबाद, अॅबटाबाद येथील विद्यापीठे, वैद्यकीय डेटाबेस, ‘दस्तक’ या वाहन परवाना पोर्टल, फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू आणि विविध सरकारी ईमेल सर्व्हर यांचा समावेश होता. पाकिस्तानमधील ३५ हून अधिक शैक्षणिक व सरकारी संस्थांचे मेल-सर्व्हर ही हॅक करण्यात आले आहेत.

हिंदुस्तान जिंदाबाद

सायबर कमांडर या सायबर हॅकर्सच्या गटाने या हॅकिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी पाकिस्तानी संकेतस्थळांवर हिंदुस्तान जिंदाबादच्या संदेशासह पाकिस्तानी यंत्रणांना थेट इशारा देण्यात आला आहे. “हिंदुस्तान झिंदाबाद. शाळा आणि माजी सैनिकांच्या संकेतस्थळांवर हल्ले करता आणि खोटा प्रचार करता. हे तुम्ही किती दुर्बळ आहात, याचे प्रतिक आहे. तुम्ही बाइट्सनी लढण्याबद्दल बोलता? छान, कारण आम्ही तुमचे प्रत्येक बाइट पाहतो. हा सर्व अपप्रचार वेळीच थांबवा नाहीतर तुम्हाला मोठ्या सायबर शक्तीला तोंड द्यावे लागले. ती शक्ती तुमच्या कल्पनेपलीकडची आहे.

याशिवाय आणखी एका संदेशात तुमचा खेळ संपला. — सायबर कमांडर आंतरराष्ट्रीय सायबर नीतीचे पालन करतो आणि जबाबदार वर्तन करतो. पण हे सायबर प्रतिहल्ले आमची सायबर क्षमता दाखवून देण्यासाठी केले आहेत. भारताविरुद्ध अपप्रचाराचे तुमचे प्रयत्न अयशस्वी ठरतील. तसेच आम्ही प्रत्येक बाइट पाहतो आणि आपले सायबर संरक्षण करण्यात सज्ज आहोत, असे संदेश या गटाकडून पाकिस्तानी संकेतस्थळांवर देण्यात आले आहेत. भारत सायबर आक्रमणे आणि अपप्रचार सहन करणार नाही. इथल्या संस्था किंवा नागरिकांविरुद्ध सायबर आक्रमण करणाऱ्यांनी तात्काळ हे थांबवावे. अन्यथा अशा कृतींना ज्या प्रकारचा प्रत्युत्तर मिळेल, ते तुम्हाला सहन होणारे नाही.

खालील महत्वाच्या संकेतस्थळांचे अधिकृत डेटाबेस हॅक करण्यात आले होते:

अधिकृत वाहन परवाना पोर्टल (दस्तक)

फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू (IRIS 2.0)

इंटर बोर्ड्स कोऑर्डिनेशन कमिशन (IBCC)

व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी ऑफ पाकिस्तान (vu.edu.pk)

डिव्हाइस ओळख, नोंदणी आणि ब्लॉकिंग प्रणालीचे अधिकृत संकेतस्थळ (DIRBS)

नॅशनल डेटाबेस अँड रजिस्ट्रेशन अथॉरिटी (NADRA) चे अधिकृत संकेतस्थळ

पाकिस्तानमधील ३५ हून अधिक शैक्षणिक व सरकारी संस्थांचे मेल-सर्व्हर

पाकिस्तानी संकेतस्थळावर कोणत्या प्रकारचे हल्ले झालेत

ओळख चोरी आणि फसवणूक

डेटामध्ये फेरबदल

सेवेत अडथळा निर्माण करणे

राष्ट्रीय सुरक्षेला धोका