मुंबई : गुंतवणूकीतून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने लालबाग येथील व्यक्तीची दोन भिन्न टोळ्यांनी सायबर फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. सेवानिवृत्त असलेल्या या तक्रारदाराची एकूण दोन कोटी ६० लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. आरोपींनी बनावट मोबाइल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून तसेच कॅपिटल मार्केटमध्ये गंतवणूकीच्या नावाखाली ही फसवणूक केली. याप्रकरणी तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीवरून मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहाराच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत.

५८ वर्षीय तक्रारदार लालबाग परिसरातील रहिवासी असून एका खासगी कंपनीत उच्च पदावरून निवृत्त झाले आहे. ते १० जूनला फेसबुक पाहत असताना त्यांना शेअर मार्केट विषयी एक जाहिरात दिसली. जाहिरातीवर क्लीक केल्यानंतर ते कुवेरा अल्फा क्लब नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील झाले.

त्या ग्रुपमध्ये तक्रारदारासह १०२ आणखी सदस्य व ग्रुप अॅडमिन होते. या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भातील दैनंदिन माहिती दिली जात होती. ग्रुपमधील अॅडमिन सभासदांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत होता. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास किती फायदा होईल, कोणते आयपीओ फायदेशिर आहेत, याबाबत माहिती मिळत असल्याने त्यांना शेअर मार्केट गुंतवणुकीबाबत आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी अॅडमिनशी चर्चा करुन त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. त्यानंतर ते दुसऱ्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये सामील झाले. त्या ग्रुपमध्ये लिंकद्वारे तक्रारदाराला कुवेरा हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्याद्वारे तक्रारदाराने डीमॅट खाते उघडले. त्यानंतर ऋतुजा लाड व निलभ सांन्याल नावाने दोन सल्लागार तक्रारदाराशी संपर्क साधत होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार तक्रारदाराने गुंतवणूक करत होता. तक्रारदाराने ५६ लाख २० हजार रुपये गुंतवले.

दोन कोटींची गुंतवणूक

त्याच काळात तक्रारदाराने युटीआय कॅपीटल नावाने ऑनलाईन जाहिरात पाहिली. तक्रारदाराने त्यावर क्लीक केले असता त्यांना युटीआय कॅपिटल स्टॉर्म नावाच्या ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराला लिंक पाठवून ओटीसी खाते उघडण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराला गुंतवणूकीसाठी तेथे सान्या कपूर व इम्तियाझुर रेहमान नावाचे व्यक्ती सल्ला देत होते. त्यांच्या सल्ल्यानुसार तक्रारदाराने विविध बँक खात्यात दोन कोटी सात लाख ९२ हजार रुपये जमा केले.

…आणि संशय निर्माण झाला

तक्राराला शेअर मार्केटच्या गुंतणूकीत चांगला फायदा झाला होता. त्यामुळे तक्रारदाराने २९ जुलैला काही रक्कम काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कुवेरा अॅप्लिकेशनचे सल्लागार लाड व सांन्याल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाच टक्के रक्कम भरल्यावर नफा काढता येईल, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने युटीआय कॅपीटलच्या नावाने संपर्कात आलेले दोन गुंतवणूक सल्लागार कपूर व रेहमान यांच्याशी संपर्क साधला.त्यावेळी त्यांनी तक्रारदाराला कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सायबर हेल्पलाईनला दूरध्वनी केला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.