लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानदेव वानखेडे यांनी सायबर फसवणूक झाल्याबाबतची तक्रार ओशिवरा पोलिसांकडे केली आहे. ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांची सुकामेवा स्वस्तात देण्याच्या नावाखाली ३० हजार रुपयांची फसणूक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्ञानदेव वानखेडे भारतीय महसूल सेवा अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील आहेत.

वानखेडे यांनी फेसबुकवर सुकामेव्याबाबतची जाहिरात पाहिली होती. जाहिरातीवर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील मंगल ड्रायफ्रुट असे लिहिले होते. तसेच त्यावर अजित बोरा नावाच्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक दिला होता. वानखेडे यांनी त्या क्रमाकावर रविवारी दूरध्वनी केला असता संबंधित व्यक्तीने स्वस्त दरात सुकामेवा देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार तक्रारदारांनी बदाम, काजू, अंजिर व आक्रोड अशी एकूण दोन हजार रुपयांच्या सुका मेव्याची यादी पाठवली व दोन हजार रूपये ई वॉलेटद्वारे पाठवून दिले.

आणखी वाचा-वसई-विरारची तहान भागेना… सूर्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुन्हा रखडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर रविवारी सायंकाळी वानखेडे यांना दुसरा एका क्रमांकारवरू दूरध्वनी आला. तुमचे सुकामेव्याचे पार्सल तयार आहे. पण वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) हा व्यवहार लॉक झाला आहे. त्यामुळे जीएसटी भरावा लागेल, असे त्याने सांगितले. त्यावर वानखेडे यांनी काही वेळाने पुन्हा दूरध्वनी करून मला सुकामेका नको असून आपले पैसे परत करण्यास सांगितले. त्यावर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने बँक खात्यात काही तांत्रिक बिघाड असून प्रथम एक रुपया पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने एक कोड पाठवला. या कोडचा वापर करून व्यवहार केला असता वानखेडे यांच्या खात्यातून चार ते पाच व्यवहार झाल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानतंर त्यांनी याप्रकरणी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली.