मुंबई : सायबर फिशिंग करणाऱ्या टोळय़ा दरवेळी नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करून नागरिकांची फसवणूक करीत आहेत. सध्या थकीत वीज बिलांच्या माध्यमातून ग्राहकांना लक्ष्य करण्यात येत आहे. पवई येथे राहाणाऱ्या ६३ वर्षीय महिला वीज बिल भरण्याचा संदेश पाठवून अडीच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. त्यासाठी त्याने एका अ‍ॅप्लिकेशनचा वापर केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी घाटकोपर येथील पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचे संदेश सध्या अनेक नागरिकांना येत आहेत.

तक्रारदार महिला व्यवसायाने वकील आहे. १६ मेला त्या कामानिमित्त वांद्रे येथे जात असताना त्यांच्या मोबाइलवर एक संदेश आला. या संदेशात त्याचे थकीत वीज बिल भरावे लागणार असल्याचे नमुद करण्यात आले होते. काही वेळाने त्यांना दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण खासगी विद्युतपुरवठा कंपनीतील कर्मचारी असल्याचे सांगून वीज बिलाची माहिती अद्ययावत करण्यासाठी ११ रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यासाठी गूगल प्लेवर जाऊन ‘एनी डेस्क’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची सूचना त्याने तक्रारदारांना केली. त्यानंतर ‘एनी डेस्क’ डाऊनलोड करून तक्रारदार महिलेने त्यांच्या डेबिट कार्डद्वारे ११ रुपये ऑनलाइन भरले. त्यानंतर तक्रारदार महिलेला त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढल्याचे चार संदेश प्राप्त झाले. त्याद्वारे अनुक्रमे ५९ हजार, ५९ हजार ५००, ६० हजार व ६० हजार रुपयांचे व्यवहार त्यांच्या बँक खात्याद्वारे करण्यात आले.  तक्रारदार महिलेने तात्काळ बँकेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कार्ड बंद करण्यास सांगितले. पण त्यापूर्वी या महिलेच्या बँक खात्यातून दोन लाख ३८ हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले होते.

याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पार्कसाईट पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बँकेकडून या चार व्यवहारांची माहिती मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सध्या अनेक ग्राहकांना अशा प्रकाचे संदेश पाठवण्यात येत आहेत. अशा अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त होत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

फसवणुकीची कार्यपद्धत

एखाद्या व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आरोपी त्याला बोलण्यात गुंतवतात. तसेच थकीत वीजबिल पडताळण्याच्या बहाण्याने ते ग्राहकांकडून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळावतात. त्यासाठी ‘एनी डेस्क’, ‘टीम व्ह्युवर’सारखे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगतात. त्याच्या माध्यमातून मोबाइलवर नियंत्रण मिळवून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली जाते. त्यामार्फत बँक खात्यातून रक्कम काढली जाते.

ग्राहकांनी घ्यावयाची काळजी

* वीज बिलाची, बँक खात्याची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका.

* अनोळखी क्रमाकांवरून पाठवण्यात आलेल्या लिंक अथवा देण्यात आलेल्या माहितीवरून कोणतेही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू नका .

* -फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधून डेबिट अथवा क्रेडिट कार्डवरील व्यवहार बंद करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* फसवणुकीला बळी पडल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा.