मुंबई : ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाप्रमाणे मोबाइलवर बोलताना मुलीचा आवाज काढून अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. वधू-वर सूचक संकेतस्थळावरून आरोपी तरुणांची फसवणूक करत होते. सुनील मोदी (६२) व संकेत चव्हाण (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी माटुंग्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनीयर तरुणाला अशाच प्रकारे फसवले होते. त्याच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.
हेही वाचा >>> तोतया प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या टोळीला ४८ तासांत अटक, व्यावसायिकाच्या घरात छापा टाकून १८ लाखांची लूट
दोन्ही आरोपी सराईत असून यापूर्वीही त्यांना अटक झाली होती. त्यावेळी आर्थररोड कारागृहात दोघांची ओळख झाली. या वर्षांच्या सुरुवातीला त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर दोघेही भेटले. त्यावेळी मोदीने बनावट कागदपत्राद्वारे अश्विनी मनोहर पंडित अशा नावाने बनावट प्रोफाइल तयार केले. तिच्या नावाने न्यायालयीन शिक्के त्यांनी तयार करून संबंधित तरुणी महानगर दंडाधिकारी असल्याचे दाखवले. तसेच पैसे देण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींच्या नावाने बनावट वॉरंट तयार करण्याचे कामही मोदी करत होता. प्रोफाइल तयार केल्यानंतर वधु-वर सूचक संकेतस्थळावर अनेक तरुणांनी लग्नासाठी संपर्क साधला. तरुणांना फसवण्यासाठी आरोपींनी नाशिकमधील समाज माध्यमावर सक्रिय असलेल्या तरुणीचे छायाचित्र वापरले होते.