scorecardresearch

मुंबई : सायबर पोलिसांनी वाचवले साडेसात लाख रुपये

सहा महिन्यात एक कोटींहून अधिकची रक्कम वाचवली, कशी वाचवली रक्कम वाचा…

मुंबई : सायबर पोलिसांनी वाचवले साडेसात लाख रुपये
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई : महिलेला अर्धवेळ नोकरी देण्याचे आमिष दाखवून बँक खात्यातून लुटलेले साडेसात लाख रूपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. गेल्या सहा महिन्यांत सायबर पोलिसांनी १९३० क्रमांकाच्या माध्यमातून एक कोटी रुपयांहूून अधिकची रक्कम वाचवली आहे.

मुलुंड येथील तक्रारदार महिलेला अर्धवेळ नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी फसवणूक केली होती. या महिलेला निरनिराळी कारणे सांगून १३ लाख १८ हजार रुपये विविध खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले होते. संबंधित महिलेने मुंबई सायबर पोलिसांच्या १९३० क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर  सायबर पोलिसांच्या पथकाला बँक खात्यातील सात लाख ५२ हजार रुपयांची रक्कम वाचविण्यात यश आले. ती रक्कम एका बँक खात्यात गोठवण्यात आली असून लवकरच ही रक्कम तक्रारदाराला परत करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> बालन्याय कायद्यातील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती; महान्यायअभिवादींनी याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

सायबर गुन्हेगार सर्वसामान्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जन्मभराच्या कमाईवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी १७ मे २०२२ रोजी १९३० क्रमांकाची सायबर हेल्पलाईन सुरू केली होती. गेल्या सहा महिन्यांमध्ये सायबर हेल्पलाईनच्या माध्यमातून एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. ई-मेल फिशिंग, ऑनलाईन नोकरी, क्लासिफाईड, केवायसी सुधारणा, वधू-वर सूचक संकेतस्थळावरील ओळख, समाज माध्यांवर ओळख, ओटीपी, सेक्सटॉर्शन यांसारख्या प्रकरणांमध्ये फसवणूक करून ही रक्कम लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.  ही हेल्पवलाईन सध्या सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत कार्यरत आहे. भविष्यात ही हेल्पलाईन २४ तास सुरू ठेवण्यात येणार असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा >>> बाळासाहेब थोरातांची कोंडी; कुटुंबीयांचीच बंडखोरी

रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना अल्पावधीत तातडीने उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. या कालावधीला ‘गोल्डन अवर्स’ म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्यास लवकरात लवकर सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पैसे वाचवणे शक्य होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यासाठी आठवड्याचा कालावधी लागत होता. त्याचा फायदा घेत आरोपी खात्यातील रक्कम काढायचे. पोलिसांच्या हेल्पलाईनला दूरध्वनी केल्यास तात्काळ फसवणुकीची रक्कम गोठवणे शक्य होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 11:47 IST

संबंधित बातम्या