Dadar Kabutarkhana Protest by Jain Community: मुंबईच्या दादर परिसरात आज सकाळी कबुतरखान्याजवळ मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेनं तातडीने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करून त्यावर ताडपत्री टाकून ते झाकले. मात्र, जैन समुदायाकडून याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आज सकाळी दादरच्या झाकलेल्या कबुतरखान्याजवळ मोठ्या संख्येनं आंदोलक जमा झाले व त्यांनी ताडपत्री फाडून आतमध्ये प्रवेश केला. घोषणाबाजी, पोलिसांशी हुज्जत असे प्रकार तिथे पाहायला मिळाले. मात्र, तिथे गोंधळ घालणारे बाहेरचे लोक होते, असं विधान मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.

दादरच्या राड्याबाबत काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

“जे काही झालं ते चुकीचं झालं. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांचं ऐकून योग्य निर्देश दिले होते. लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. ते सर्व विचारात घेऊन मुख्यमंत्र्यांनी योग्य आदेश दिले होते. पण आज सकाळी जे काही झालं ते चुकीचं होतं. त्यामुळे मी इथे आलो. माझी सगळ्यांना विनंती आहे की शांतता राखा. कायदा हातात घेऊ नका. सरकारचं याकडे लक्ष आहे. उद्या न्यायालयात सुनावणी आहे. तिथे काय निर्णय होतोय ते आपण बघू. तोपर्यंत शांतता राखा”, अशी प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढा यांनी दादर कबुतरखान्याजवळील राड्यावर बोलताना दिली.

“मला माहिती मिळाल्यानंतर मी लगेच इकडे आलो. सकाळी झालं ते चुकीचं होतं. मी अधिकाऱ्यांशी बोललो. मंदिरात जाऊन ट्रस्टींशीही बोललो. त्यांनी सांगितलं की त्यांचा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही. बाहेरच्या लोकांनी येऊन हा गोंधळ घातला आहे. ट्रस्टींनी आजची बैठक पुढे ढकलली होती”, असं मंगलप्रभात लोढा यावेळी माध्यमांना म्हणाले.

दादरमध्ये जे घडलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो – लोढा

“काल मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश ट्रस्टींना मान्य होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले होते. त्यानंतर आज काही लोकांनी कबुतरखान्यात घुसून काही लोकांनी जे काही केलंय, त्यात जैन समाज किंवा साधु-संत समाज त्यांच्यासोबत नाही. जे काही घडलं, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही इथे कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाही. मी सर्वांना आवाहन करतो की शांतता राखा. कुणीही कायदा हातात घेऊ नका”, असं आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केलं.

“कबुतरखान्याजवळील आंदोलनामुळे कबुतरांचंच नुकसान”

“मुख्यमंत्र्यांनी काल सर्वांचं ऐकून निर्देश दिले आहेत. लोकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाईल आणि कबुतरही मरायला नकोत अशा पद्धतीने मार्ग काढण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आज हे आंदोलन ज्यांनी कुणी केलं, त्यांनी उलट कबुतरांचंच नुकसान केलं आहे. न्यायालयात सरकारकडून बाजू मांडण्यासाठी तयारी केली जात आहे. ती करू द्या. सहकार्य करा अशी माझी विनंती आहे”, अशा शब्दांत लोढांनी कबुतरखान्याजवळ झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली.

दादरच्या कबुतरखान्याजवळ नेमकं काय घडलं?

सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्याला विरोध करणारे व समर्थन करणारे यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वांगीण चर्चा करून न्यायालयात समतोल भूमिका मांडण्याचं आश्वासन फडणवीसांनी दोन्ही बाजूंना दिलं. त्यानंतर दादर येथील जैन समुदायानं आजचं आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आज सकाळी दादरच्या कबुतरखान्याजवळ मोठ्या संख्येनं नागरिक जमा झाले. यातील बहुतांश नागरिक जैन समुदायाचे असल्याचं प्रसारमाध्यमांमधील दृश्यांवरून स्पष्ट होत होतं.

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हे नागरिक कबुतरखान्याजवळ जमा झाले व त्यांनी त्यावर झाकलेली ताडपत्री काढण्यास सुरुवात केली. पोलिसांना माहिती मिळताच तिथे तातडीने मोठ्या संख्येने पोलीस दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना दूर सारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. यातील काही आंदोलक महिलांनी ताडपत्री काढून कबुतरखान्यात प्रवेश केला. तिथे ताडपत्री टाकण्यासाठी केलेलं बांबूचं बांधकामही काढण्यास आंदोलकांनी सुरुवात केली. यानंतर कबुतरखान्यात कबुतरांसाठीचं खाद्य टाकण्यात आलं. थोड्याच वेळात तिथे पुन्हा एकदा कबुतरांची मोठी गर्दी खाण्यासाठी पाहायला मिळाली.