मुंबई : मुंबई-ठाण्यामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्यात गोिवदा पथके व्यग्र असतानाच शनिवारी उत्सवाला गालबोट लागले. मानखुर्द परिसरात बाल गोविंदांसाठी दहीहंडी बांधणाऱ्या एकाचा पडून मृत्यू झाला, तर अंधेरी येथील गोविंदा पथकासमवेत गेलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तसेच रात्री ९ वाजेपर्यंत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थरांवरून कोसळून ९५ जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. ठाण्यातही सतरा जण जखमी झाले.
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात बाल गोविंदांसाठी दुपारी ३ च्या सुमारास दहीहंडी बांधत असताना जगमोहन शिवकिरण चौधरी (वय ३२) याचा पहिल्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. पहिल्या मजल्यावरून पडल्यानंतर जगमोहनला त्याच्या नातेवाइकांनी तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईत विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना थरावरून पडल्याने ७५ जण जखमी झाले आहेत. यातील ४३ जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले, तर विविध रुग्णालयांमध्ये ३२ गोविंदांवर उपचार सुरू असून, त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
मुंबई शहरामध्ये ४८ जण जखमी झाले असून, त्यापैकी २७ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर जी.टी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर २१ जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले. तसेच पूर्व उपनगरामध्ये १७ जण जखमी झाले आहेत. त्यातील चौघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, १३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पश्चिम उपनगरामध्ये १० जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून, नऊ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. दरम्यान, थरावरून कोसळून जखमी झालेल्या गोविंदाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मालाडमध्ये बाल गोविंदा जखमी
मालाडमध्ये एका चाळीमध्ये बांधलेली दहीहंडी फोडताना थरावरून पडून नऊ वर्षांचा बाल गोविंदा जखमी झाला. त्याला कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. मालाडमधील कुरार गावातील तानाजी नगर चाळीमध्ये शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता बाल गोविंदांसाठी दहीहंडी बांधली होती. ही दहीहंडी फाेडताना बाल गोविंदा आर्यन यादव (९) थरावरून खाली पडून जखमी झाला.
मुंबईत भरपावसात गोविंदांचा थरार; आठ ते नऊ थर लावण्यासाठी चुरस
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये शनिवारी सकाळपासूनच पाऊस कोसळत होता. या पावासाची तमा न बाळगता शनिवारी सकाळपासूनच मोठ्या संख्येने गोविंदा घरातून बाहेर पडले. त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकणी सकाळपासून गोविंदांची वर्दळ दिसत होती. दुपारी पावसाचा जोर कमी झाला आणि गोविंदांमधील उत्साह शिगेला पोहचला. दादर, वरळी, अंधेरी, बोरिवली, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप या भागांमधील मानाच्या दहीहंडी उत्सवांत सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांमध्ये चढाओढ लागली. गोविंदांप्रमाणे गोपिकांनीही सहा ते सात थरांची सलामी दिली.
मागील काही वर्षांपासून दहीहंडीसाठी लावण्यात आलेल्या पारितोषिकांमध्ये वाढ होत आहे. त्यातही सात, आठ व नऊ थरांसाठी जाहीर केलेली अधिक रकमेची पारितोषिके मिळविण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस लागली होती. यंदा गोविंदा पथकांचा सात ते आठ थर रचण्याकडे अधिक कल होता. तर नामांकित गोविंदा पथकांमध्ये नऊ थर लावण्यासाठी चुरस लागली होती. जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने सकाळीच दादरमध्ये सलामी दिली. मात्र त्यानंतर घाटकोपरमध्ये १० थर रचून मुंबईमध्ये सर्वाधिक मानवी मनोरे रचण्याचा विश्वविक्रम रचला. तसेच आयडियल बूक डेपो येथे शिवसागर गोविंदा पथकाने चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून बलिदानापर्यंतचा इतिहास सादर करून परंपरा कायम ठेवली. मुंबईत ९० च्या दशकामध्ये गोविंदा पथके विविध चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करीत होते. त्याची आठवण शिवसागर गोविंदा पथकाने थरावर सादर केलेल्या नाट्यातून झाली.
गौतमी पाटीलची हजेरी
बोरिवलीतील मागाठणे येथील देवीपाड मैदानामध्ये अमदार प्रकाश सुर्वे यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या दहीहंडीला अनेक गोविंदा पथकांनी सलामी देत मोठी बक्षीसे जिंकली. या दहीहंडीला अनेक सिनेकलाकारांची उपस्थिती दाखवत गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. मात्र गौतमी पाटीलची उपस्थिती ही विशेष आकर्षण ठरली. गौतमी पाटीलने आपल्या नृत्य अदाकारांनी गोविंदांची मने जिकून घेतली.
ऑपरेशन सिंदूरला दहीहंडी समर्पित
दरवर्षीप्रमाणे यंदा आमदार राम कदम यांनी घाटकोपरमध्ये भारतातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले होते. ही दहीहंडी ‘ऑपरेशन सिंदूर’ला समर्पित होती. यावेळी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या भारतीय सैन्य दलातील सैनिकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय सैनिकांना सलाम करण्यासाठी राम कदम यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.
घाटकोपरमध्ये जय जवानचा विश्वविक्रम
आपलाच विक्रम मोडीत काढण्याची परंपरा यंदा जोगेश्वरीतील जय जवान पथकाने कायम ठेवली. जय जवान गोविंदा पथकाने यंदा घाटकोपर येथे १० थर रचून गतवर्षीच्या आपल्या साडेनऊ थरांचा विक्रम मोडीत काढला. घाटकोपर येथे मनसेचे गणेश चुक्कल व अरविंद गिते मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला.
मुख्यमंत्र्यांनी फोडली परिवर्तन हंडी
मुंबईमध्ये भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून उभारण्यात आलेल्या दहीहंडींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी वरळीतील जांभोरी मैदानात आमदार ॲड. आशिष शेलार आणि भाजपा-मुंबई आयोजक ॲड. संतोष पांडे यांच्या परिवर्तन इंडिया फाऊंडेशनकडून परिवर्तन दहीहंडीचे आयोजन केले हाेते. ही परिवर्तनाची हंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडली. यावेळी गोविंदा पथकाने छावा सिनेमातील दृश्यच उंच मनोऱ्यावर सादर केले. छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाच्या जबड्यात हात घालण्याचे दृश्य, कवी कलश यांच्या कविता, संभाजीराजेंची भेट अशी दृश्य यावेळी थरांवर उभे राहून सादर करण्यात आले.
दोघांची प्रकृती गंभीर
* मालाडमधील कुरार गावातील तानाजी नगर या चाळीमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी चढलेला आर्यन यादव (९) हा बालगोविंदा थरावरून खाली पडून जखमी झाला. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आली.
* जी. टी. रुग्णालयात अक्षय बंडल या २८ वर्षांच्या गोविंदाला उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्याच्या कपाळाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव मोठय़ा प्रमाणात झाला होता.