या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयाचे र्निबध धुडकावत आयोजक, गोविंदा पथकांची बेमुर्वतखोरी

दरवर्षी लाखोंच्या आमिषापायी रंगणारी थरांची जीवघेणी स्पर्धा, त्यामुळे गोविंदांचे होणारे अपघात, या उत्सवातील दणदणाटामुळे होणारे ध्वनिप्रदूषण व सर्वसामान्यांना होणारा त्रास या गोष्टी विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर आणलेल्या र्निबधांना गुरुवारी दहीहंडीचे आयोजक आणि गोविंदा पथकांनी अक्षरश: पायदळी तुडवले. लोकशाहीचा मुख्य स्तंभ असलेल्या न्यायालयाचे आदेश पाळायचेच नाहीत, असा चंग बांधून रस्त्यावर उतरलेल्या गोविंदा पथकांनी आठ-नऊ थरांचे मनोरे उभारले आणि १२-१३ वर्षांच्या बालगोविंदांचाही वापर केला. त्यांच्या या बेमूर्वतखोरीला अनेक ठिकाणी आयोजकांचीही साथ मिळाल्याने दहीहंडीचा उत्सव गुरुवारी उन्मादाचा उत्सव ठरला.

गिरगाव

शिवसेना दक्षिण मुंबई विभागातर्फे गिरगावातील शिवसेना शाखा क्रमांक २१५ जवळ आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात ध्वनिप्रदूषणाचे सर्व नियम आणि सर्वोच्च न्यायालयाचे र्निबध धाब्यावर बसविण्यात आले. या ठिकाणी आलेल्या अनेक गोविंदा पथकांनी पाच-सहा थर रचले. विशेष म्हणजे, येथे आयोजकांकडून गोविंदा पथकांना नियमांचे उल्लंघन न करण्याविषयी बजावण्यात येत होते. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. बहुसंख्य गोविंदा पथकांमधील १८ वर्षांखालील मुलांनी थरामध्ये सहभागी होत सलामी दिली.

काळा चौकी व अभ्युदयनगर

चिंचपोकळी स्थानकाकडून अण्णा यशवंत चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दिग्विजय मिल चाळीकडून रस्त्याच्या मधोमध दोन हंडय़ा बांधण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. येथून जाणाऱ्या वाहनांवर दिग्विजय चाळीतील महिला पाइपद्वारे पाणी व प्लास्टिक फुगे मारत होत्या. अभ्युदयनगर येथील शहीद भगत सिंग मैदान येथे शिवसेना व मनसे यांच्यात दहीहंडी उत्सवादरम्यान चढाओढ लागली होती. शिवसेना शाखा क्रमांक २०० तर्फे अभ्युदयनगर येथे भररस्त्यात हंडी बांधण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तर शहीद भगत सिंग मैदानात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. या दोन्ही मंडळांकडे येणाऱ्या बहुतेक गोविंदा पथकांनी हेल्मेट व सुरक्षा पट्टय़ाचा वापर टाळला. तर हंडी फोडताना खाली ‘मॅट’चीही सोय करण्यात आली नव्हती. या ठिकाणी ओंकार गोविंदा पथकाने सात थरांची हंडी बांधली तर बंडय़ा मारुती या गोविंदा पथकातील मुले १८ वर्षांखालील होती.

नक्षत्र मॉल, दादर

दादर येथे मनसेच्या प्रकाश पाटणकर यांच्या दहीहंडी मंडळाने पाण्याचा यथेच्छ मारा केला. त्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना पाण्याच्या वाहिन्या बांधून व हंडीला पाण्याची वाहिनी जोडण्यात आली होती. सेनाभवन समोर युवा सेनेने रस्त्याच्या मधोमध बांधलेल्या दहीहंडीमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे दिसून आले.

जांबोरी मैदान, वरळी

जांबोरी मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन अहिर यांच्या दहीहंडी उत्सवादरम्यान थरांच्या उंचीचा नियम पाळण्यात आला. मात्र हंडी फोडण्यासाठी व सलामी देण्यासाठी येणाऱ्या गोविंदा पथकातील मुले मात्र १८ वर्षांखालील होती. तसेच, ही पथके हेल्मेट व सुरक्षा पट्टय़ाचा वापर करीत नव्हती. हंडी फोडण्यासाठी मंडळाकडून ‘मॅट’चा वापरही करण्यात आला नव्हती.

रुग्ण बेहाल

जांबोरी मैदानासमोर लावण्यात आलेल्या डीजेमुळे येथील डॉ. टिळक रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या हालांना पारावार नव्हता. या ४० खाटांच्या संपूर्ण रुग्णालयात डीजेचा आवाज भरून राहिला होता. या रुग्णालयात सध्या २२ रुग्ण दाखल आहेत. रुग्णालयातील सर्व खिडक्या बंद असूनही आवाज येत होता.

देवीपाडा, मागाठाणे

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी पुरस्कृत केलेल्या मागाठाणे येथील दहीहंडी उत्सवादरम्यान अनेक नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आले. तारामती फाऊंडेशन व लोकसेवा मंडळाची ही हंडी फोडण्यासाठी आलेल्या बहुतेक गोविंदा पथकात १८ वर्षांच्या आतील मुले-मुली सहभागी झालेली दिसली.  देवीपाडा मैदान हे पश्चिम द्रुतगती मार्गालगत असल्याने येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच पथकांनी रस्त्यालगतच वाहने लावून नियम मोडीत काढले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahi handi celebration in mumbai
First published on: 26-08-2016 at 02:29 IST