मुंबई : तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेला दहीहंडी उत्सव मुंबईसह राज्यात साजरा होत आहे. ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम, गोविंदा रे गोपाळा, मच गया शोर सारी नगरी रे या गाण्यांवर दहीहंडीप्रेमी मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार अनुभवत आहेत. मुंबईतील गल्लोगल्ली, कुलाबा, गिरगाव, ताडदेव, लालबाग, परळ, काळाचौकी, वरळीमधील जांबोरी मैदान व श्रीराम मिल नाका, दादरमधील आयडीयलची गल्ली, शिवसेना भवन परिसर यासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ठाण्यातही वर्तक नगर व इतर विविध ठिकाणी दहीहंडीचा उत्साही माहोल पाहायला मिळत आहे.

मुंबई व ठाण्यातील गोविंदा पथके सर्वप्रथम आपापल्या विभागातील मानाची दहीहंडी फोडून विविध ठिकाणच्या दहीहंडी उत्सवासाठी रवाना होत आहेत. कुठे कच्छी बाजा, तर बॅन्जोच्या तालावर गोविंदा पथके दहीहंडी उत्सवस्थळी मार्गस्थ होत आहेत. मुंबईसह ठाण्यात आयोजकांनी लाखो रुपयांच्या बक्षिसांसह बॅन्जो आणि डीजेचीही व्यवस्था केली आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कलाकारांचीही मांदियाळी अवतरत आहे. हे दहीहंडी उत्सव नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असून मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार अनुभवण्यासाठी गर्दी उसळत आहे.

हेही वाचा >>>सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंपरा व संस्कृती जपण्याच्या उद्देशाने काही गोविंदा पथकांकडून मानवी मनोरा रचनेत देखाव्याचे सादरीकरण करण्यासह सामाजिक संदेश देण्यात येत आहेत. तर महिला गोविंदा पथकांकडूनही चार ते पाच थर रचत शानदार सलामी देण्यात येत आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सवप्रेमींना व मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि संबंधित मतदारसंघावर पकड मजबूत करण्यासाठी विविध राजकीय पक्ष व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून लाखोंच्या बक्षिसांची खैरात केलेली पाहायला मिळत आहे.