बाल गोविंदांवर बंदी घालणारा बाल हक्क संरक्षण आयोगाचा आदेश, १८ वर्षांखालील मुलांचा दहिहंडीत सहभाग नको या मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेमुळे गोविंदा पथकांचे धाबे दणाणले आहेत़ त्यातच दहीहंडीच्या आयोजनासाठी परवाना देताना आता पोलिसांनीही कठोर भूमिका घेत नियम-अटींचे काटेकोर पालन करण्याचे लेखी हमीपत्र घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाचे आयोजक चांगलेच धास्तावले आहेत.
आपल्यावर कारवाई होऊ नये यासाठी काही पथकांनी बाल गोविंदांना दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी बाल गोविंदाच दहीहंडी फोडणार, अशी हेकेखोर भूमिकाही अनेक पथकांनी कायम ठेवली आहे. आता रविवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी मानाच्या दहिहंडय़ा फोडताना बाल गोविंदांचा वापर होतो की नाही व त्यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दहीहंडी फोडणाऱ्यांमध्ये १८ वर्षांखालील व्यक्तीचा समावेश असू नये, अशी सूचना करीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्णय घेण्याचे आदेश शुक्रवारी दिले. तसेच बाल हक्क संरक्षण आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आता पोलिसांनी या संदर्भात कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. दहीहंडी उत्सवाच्या आयोजनस्थळी वाद्याचा अथवा संगीताचा आवाज नियोजित मर्यादेत असेल, असे लिहून घेतल्यानंतरच आयोजकांना परवाना दिला जात आहे. तसेच बाल गोविंदाचा समावेश करू नये, असे बजावून पथकांना परवाना दिला जात आहे.
नारळी पौर्णिमेच्या दिवशीही काही ठिकाणी खास मानाच्या दहीहंडय़ा बांधण्यात येतात़  उद्या, रविवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी बाल गोविंदांना दहीहंडी फोडायला द्यायची की नाही, असा प्रश्न आयोजक आणि गोविंदा पथकांना पडला आहे. मात्र काही पथकांनी कोणत्याही परिस्थितीत बाल गोविंदाच दहीहंडी फोडणार असा पवित्रा घेतला आहे. काही ठिकाणी आयोजकांनी बाल गोविंदांना मनाई केली आहे. अशा आयोजकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काही मोठय़ा गोविंदा पथकांनी घेतला आहे. मात्र मानाची दहीहंडी फोडताना बाल गोविंदाचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसही सज्ज झाले आहेत. आयोगाच्या आदेशाच्या पाश्र्वभूमीवर नारळी पौर्णिमेचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.
बाल गोविंदांवर बंदी घाला -पूनम महाजन
राजकारण्यांनीही आता हळूहळू गोविंदा पथकांची साथ सोडायला सुरुवात केली आहे. भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी थेट केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांना पत्र पाठवून बाल गोविंदांच्या सहभागावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दहीहंडीवेळी जखमी होणाऱ्या मुलांचे प्रमाण लक्षात घेता लहान मुलांच्या हितासाठी तातडीने बाल गोविंदांवर बंदी घालावी, राज्य सरकारला त्याबाबत आदेश द्यावेत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
गोविंदांच्या जीवावर..
*रविवार ३ ऑगस्ट रोजी करी रोड येथे सराव करताना राजेंद्र बैकर (३५) हा गोविंदा जबर जखमी झाला. मणक्याला दुखापत झाल्याने केईएम रुग्णालयात त्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली.
*नागेश प्रभाकर हा गोविंदा दोरी तुटल्याने डोक्यावर पडला़ काही वर्षांपासून तो अंथरुणाला खिळून आह़े
*२०१० मध्ये ठाण्यात दहीहंडी फोडताना किशोर कांबळे (२१) याचा कोसळून मृत्यू झाला.