मुंबई : जालियनवाला बाग, अंदमान कारागृह, कारगिलमधील युद्धस्मारके ही दु:खाचे स्मरण करून देणारी ठिकाणे. पण तरीही दरवर्षी अशा ‘वेदनादायी’ ठिकाणांना लाखो पर्यटक भेट देतात. याच ‘डार्क टुरिझम’ प्रकारात आता ताज्या शोकांतिका स्थळांची भर पडत आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनाग्रस्त इमारत, मुंब्य्रातील अरुंद रेल्वे रूळ किंवा वायनाडमधील दरडग्रस्त परिसर अशा ठिकाणांना भेटी देण्याकडे कल वाढत चालला असून पर्यटनाचा हा नवा ‘शौक’ चर्चेचा विषय ठरत आहे.
‘डार्क टुरिझम’ ही संकल्पना नवी वाटत असली तरी, त्याचे मूळ जुनेच आहे. मानवी मृत्यूंची साक्षीदार ठरलेली युद्धस्थळे, ऐतिहासिक क्रौर्याच्या आठवणी सांगणाऱ्या यहुदींच्या छळछावण्या यांचा इतिहास जाणून घेण्याच्या उत्कंठेने लाखो पर्यटक अशा ठिकाणी जात असतात. भारतातही जालियनवाला बाग, भोपाळ गॅस दुर्घटना स्मारक, पंजाबमधील ऑपरेशन ब्लू स्टार राबविण्यात आलेली जागा अशी ऐतिहासिक ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात. परंतु, गेल्या काही वर्षांतल्या दुर्घटना किंवा हिंसाचाराच्या घटनांच्या स्थळांनाही पर्यटक आवर्जून भेट देत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सर्वच ठिकाणांच्या ‘टूर’ नेहमीच होत असतात. यात आता अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या ठिकाणाची भर पडली आहे.
अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळानजीकच्या बी. जे. वैद्याकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर विमान कोसळून अडीचशेहून अधिक जणांचा बळी गेला. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली ही इमारत आणि विमानाचे विखुरलेले अवशेष पाहण्यासाठी अजूनही गर्दी जमत आहे. गेल्या महिन्यात ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन लोकलमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. ‘ते’ धोकादायक ठिकाण पाहण्यासाठीही दुर्घटनेनंतर काही दिवस बघ्यांची गर्दी होत होती. केरळमधील वायनाड येथे गेल्या वर्षी दरडी कोसळून २३०हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तेथे बचावकार्य सुरू असतानाच तो परिसर पाहण्यासाठी दूरवरून येणारे पर्यटक सरकारी यंत्रणांच्या कामात अडथळा ठरले होते.
समाजमाध्यमांत वाढलेली चर्चा, इन्स्टाग्रामवरून प्रसारीत होणाऱ्या चित्रफिती, युट्युबवरील ‘व्लॉगिंग’ या घटनांबाबत सर्वसामान्यांचे कुतुहल वाढवण्यास कारणीभूत ठरतात, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. या सहली निव्वळ मनोरंजनासाठी नसून भावनिक आणि शैक्षणिक अनुभव वाढवण्याचा हेतूही त्यामागे असतो, असे एका पर्यटन कंपनीच्या प्रतिनिधीचे निरीक्षण आहे. अशा प्रकारच्या ‘डार्क टुरिझम’मध्ये दहा टक्क्यांची वाढ झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. याची ठोस आकडेवारी मिळणे कठीण असले तरी, ‘ट्रिप अॅडव्हायझर’, ‘गुगल ट्रेंड’वर अशा ठिकाणांसाठी होणारे ‘सर्च’, ‘रिव्ह्यूज’ यांचे प्रमाण वाढले आहे.
‘डार्क टुरिझममुळे टूर कंपन्यांना वैविध्यपूर्ण पॅकेज तयार करता येत असून, ‘थीम बेस्ड टूरिजम’च्या संकल्पनेला चालना मिळत आहे. हे पर्यटन जबाबदारीने, नैतिकतेने आणि संवेदनशीलतेने व्हावे, ही समाजाची आणि पर्यटन क्षेत्राची सामूहिक जबाबदारी आहे,’ असे ‘ग्लोबल प्रवासी’ या स्टार्टअपचे संस्थापक अंकुश कदम यांनी सांगितले.
‘सहानुभूती व्यक्त करण्याचा मार्ग’
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, ‘डार्क टुरिझम’मागे ‘मॉर्बिड क्युरिऑसिटी’ (भेसूर उत्सुकता) असते. काहींसाठी या ठिकाणी जाणे सहानुभूती व्यक्त करण्याचा मार्ग असतो तर, काहींसाठी इतिहासाशी नवा बंध निर्माण करण्याची इच्छा असते, असे मत मानसशास्त्रज्ञ डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. मात्र, अशा प्रकारचे ‘डार्क टुरिझम’ केवळ ‘सेल्फी पॉइंट’ न ठरता संवेदनशील पर्यटन व्हावे, अशी अपेक्षा सहल सल्लागार राजेश चौतमाळ यांनी व्यक्त केली.