मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. या अडचणी कमी करण्यासाठी आणि शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. शेती उत्पादनात आपण नवनवे उच्चांक गाठत आहोत. मात्र, शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नाही, असे मत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. भरणे यांनी मंत्रालयात मंगळवारी पदभार स्विकारला, त्यावेळी ते बोलत होते.
मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न नव्याने समजून घेण्याची गरज नाही. पहिल्या दिवसांपासून शेतकरी हिताचे निर्णयांना माझे प्राधान्य असेल. राज्यातील शेतीमध्ये विभागनिहाय, पीकनिहाय विविध आहे. त्यामुळे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांसमोरील अडचणी कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील. कृषी समृद्धी योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता योजनेला निधीची टंचाई भासणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही भरणे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राचा विकासासाठी निर्णय घेण्यात येतील. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मी प्रयत्नशील राहील, असेही फडणवीस म्हणाले. या वेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अजित पवारांचे खास विश्वासू
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे खास विश्वासू म्हटले जाते. बारामतीला जोडून असलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी हर्षवर्धन पाटील या काँग्रेसच्या मातब्बर नेत्याचा सलग तीन वेळा पराभव केला आहे. अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, राज्यमंत्री म्हणून भरणे यांना संधी दिली आहे, त्यांना अजित पवारांचे खास विश्वास म्हणून ओळखले जाते.