मुंबई: राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यााठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार १९ ते २० ऑगस्टपर्यंत असलेली मुदत २२ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
यंदा अकरावी प्रवेश संपूर्णपणे ऑनलाईन होत आहे. राज्यातील ९ हजार ५२५ कनिष्ठ महाविद्यालयांत २१ लाख ५० हजार १३० इतकी प्रवेश क्षमता आहे. यापैकी आतापर्यंत १४ लाख ५५ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १२ लाख ३४१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रत्यक्ष महाविद्यालयात घेतले आहेत. ओपन टू ऑल या अंतर्गत आता दुसरी विशेष फेरी सुरू आहे. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना १५ ते १७ ऑगस्टदरम्यान नोंदणी, अर्ज दुरुस्ती, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज व प्राधान्यक्रम भरण्याची सोय देण्यात आली होती. या फेरीची निवड यादी १९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून त्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २० ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
मात्र राज्यात काही जिल्ह्यांत होत असलेल्या जोरदार पावसामुळे उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने प्रवेश घेण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थी, पालक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.