अनधिकृतपणे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयातील बोगस डॉक्टरने केलेल्या उपचारामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी गोवंडीत घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी रुग्णालय आणि उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी डॉक्टर आणि परिचारिकेला अटक केली.

हेही वाचा >>>मुंबई: उद्रेकग्रस्त भागातील तीन लाख बालके गोवरच्या अतिरिक्त लसीच्या प्रतीक्षेत

नागपूर येथे राहणारे सोहेल हुसेन यांची पत्नी काही दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात आपल्या माहेरी आली होती. याच परिसरातील आर. एन. या खासगी रुग्णालयात ती शनिवारी बाळंतपणासाठी दाखल झाली. तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र जन्मानंतर काही वेळातच मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे येथील डॉक्टरांनी मुलीला याच परिसरातील अन्य रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. या रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर येथील डॉक्टरांनी तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले आणि तिला राजावाडी रुग्णालयात पाठवले. मात्र राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी या नवजात बालिकेचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>>मुंबई: आता महारेराच्या कार्यालयात मध्यस्थांना प्रवेशबंदी; विकासकांच्या नोंदणीकृत संघटनांच्या दोन प्रतिनिधींनाच प्रवेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोहेल यांनी तत्काळ पुन्हा आर.एन. रुग्णालयात धाव घेतली. मात्र येथील डॉक्टरांनी रुग्णालयातून पळ काढला होता. सोहेल यांनी चौकशी केली असता या रुग्णालयाची कुठेही नोंद नसल्याचे त्यांना समजले. तसेच या ठिकाणी उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे कुठलीही पदवी नसून अनधिकृतरित्या रुग्णालय चालविण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सोहेल यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोलिसांनी रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करून डॉ. अल्ताफ जाकीर खान (२२), परिचारिका सोलिया राजू खान (२८) या दोघांना अटक केली. अल्ताफ उत्तर प्रदेश येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तर सोलियाचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले असल्याचे चौकशीत उघड झाले.