रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना पिटाळून लावणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर मनमानी पद्धतीने कारवाई करत थेट एक कोटी रुपयांची हमी पोलिसांनी मागितल्याच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या १८ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. मात्र ही सभा रस्त्यावर घेता येणार नाही, अशी भूमिका घेत पोलिसांनी राज यांच्या सभेस आडकाठी आणली आहे.
ठाणे पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळील अशोक टॉकीजजवळील रस्त्यावर किंवा तलावपाळी मार्गावर राज यांच्या सभेचे आयोजन करण्यासाठी मनसेने परवानगी मागितली आहे. याशिवाय सेंट्रल मैदानाचाही सभेसाठी विचार होत असून ते मैदान शांतताक्षेत्रात येत असल्यामुळे ठाणे स्टेशन परिसरातच सभा घेणे योग्य ठरेल असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तथापि, हा रस्ता रहदारीचा व शासकीय कार्यालयांना लागून असल्यामुळे परवानगी देता येणार नाही, अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेसह विविध राजकीय पक्ष, तसेच धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असताना आता फेरीवाल्यांच्या प्रश्नावरील सभेला परवानगी नाकारून पेल्यातील वादळ का निर्माण केले जात आहे, असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला.
एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी चर्चगेट येथे आयोजित केलेल्या मोर्चालाही पोलिसांनी न्यायायालयाच्या आदेशाचा दाखला देत परवानगी दिली नव्हती. तरीही राज यांनी चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर मोर्चा व सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी रेल्वे प्रशासन व पोलिसांना रेल्वे पूल व परिसरातील फेरीवाले हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती.