निशांत सरवणकर, लोकसत्ता
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर या परिसरात सुरू असलेल्या सात मेट्रो लाइनचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. आता या प्रत्येक मेट्रो लाइनसाठी स्वतंत्र देखरेख अधिकारी नेमण्यात आला आहे. या प्रत्येक अधिकाऱ्यावर त्या-त्या मेट्रोची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
एमएमआरडीचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सर्व मेट्रो रेल्वेच्या कामाचा आढावा घेतला, तेव्हा प्रत्येक मेट्रोच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या कामात आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी वेळ लागत असल्याचे निदर्शनास आले. अशा पद्धतीने दिलेल्या मुदतीत मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे त्यात सुधारणा घडवून प्रत्येक मेट्रोसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला, असे डॉ. मुखर्जी यांनी सांगितले. या देखरेख अधिकाऱ्यावर त्या-त्या मेट्रोची कामे विहित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्या मेट्रो रेल्वेच्या कामात मोठे अडथळे आहेत, अशासाठी संचालक पातळीवरील तर इतर कामांसाठी मुख्य अभियंता, अतिरिक्त अभियंता, सहायक अभियंता आदींना देखरेख अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
आणखी वाचा-बढती मिळूनही पालिका अधिकारी जुन्याच पदावर
या बाबतचा आदेश अलीकडेच जारी करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक मेट्रोसाठी एक प्रमुख देखरेख अधिकारी तसेच अंतर्गत प्रकल्प देखरेख समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती प्रत्येक आठवड्यात बैठक घेऊन मेट्रोच्या सर्व प्रकारच्या कामाचा दैनंदिन आढावा घेईल. मेट्रोच्या कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी संचालकांसारख्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्याला सर्व मेट्रोंच्या दैनंदिन कामात गुंतवून ठेवण्याऐवजी केंद्र सरकारच्या विविध विभागांशी समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आतापर्यंत सर्व अधिकार केंद्रित होते. त्यामुळे मेट्रोच्या कामांनी म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. आता या अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्यामुळे बराच फरक पडेल, असा विश्वासही डॉ. मुखर्जी यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा-आदिवासी पाडे मुख्य रस्त्याने जोडणार; पाच हजार कोटींच्या योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता
असे असतील अधिकारी
मेट्रो लाइन : चार : वडाळा-कासारवडवली (३२.३ किमी, ३० स्थानके), चार ए : कासारवडवली- गायमुख (२.७ किमी, दोन स्थानके), टू-बी : डी एन नगर – मंडाले (२३.६ किमी, २० स्थानके), पाच : ठाणे-भिवंडी-कल्याण (२४.९ किमी, १६ स्थानके) या चार मेट्रो लाइनवर देखरेख अधिकारी म्हणून संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे तर सहा : समर्थनगर – विक्रोळी (१४.५ किमी, १३ स्थानके), सात-ए : अंधेरी पूर्व -छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (तीन किमी, दोन स्थानके) या दोन मेट्रो लाइनसाठी उप अभियंता तर नऊ : दहिसर ते मीरा भाईंदर (१०.५ किमी, आठ स्थानके) या मेट्रो लाइनसाठी मुख्य अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.