मुंबईत एकीकडे निर्बंध हळूहळू शिथिल होत असल्यामुळे बाजारपेठांसह सर्वच ठिकाणी गर्दी वाढत आहे, मात्र दुसरीकडे गेल्या आठवडाभरात पालिकेच्या चाचण्यांमध्ये घट झाली आहे. परिणामी प्रतिदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची आणि उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी झाल्याचे आढळले आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रार्थनास्थळे खुली झाल्यापासून टप्प्याटप्प्याने शहरातील अनेक निर्बंध शिथिल केले जात आहेत. आता दुकानांच्या आणि उपाहारगृहांच्या वेळाही वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठांसह शहरातील अन्य ठिकाणी आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या काळात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक संख्येने चाचण्या करणे आवश्यक आहे. मात्र असे असतानाही चाचण्यांची संख्या जवळपास ३० हजारांपर्यंत कमी झालेली आहे.

गणेशोत्सवात शहरात झालेली गर्दी आणि उत्सवानंतर बाहेरील जिल्ह्यांमधून आलेले नागरिक यांमुळे संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढविले होते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रतिदिन ४० हजार चाचण्या करण्यात येत होत्या. या काळात दैनंदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही साडेचारशेच्याही वर गेली होती. परिणामी उपचाराधीन रुग्णांची संख्याही हळूहळू वाढत साडेचार हजारांवर गेली.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही चाचण्याचे प्रमाण प्रतिदिन ४० हजारच राहिले. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढून पाच हजारांच्या पुढे गेली. परंतु गेल्या आठवडाभरात मात्र पालिकेच्या चाचण्यांचा आलेख पुन्हा खाली उतरला आहे. आठवडाभरात केवळ दोन वेळाच ३८ हजार चाचण्या झाल्या. इतर दिवशी चाचण्यांचे प्रमाण ३० हजारांच्याही खाली गेले होते. या काळात नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचीही संख्याही मागील चार दिवसांपासून खाली आली असून या काळात ३५० रुग्णांची नव्याने भर पडली आहे. पाच हजारांच्यावर गेलेली उपचाराधीन रुग्णांची संख्याही पुन्हा पाच हजारांच्या खाली आली आहे.

‘बाधितांचे प्रमाण दीड टक्क्यापर्यंत’

गेल्या आठवडाभरात सण आणि आता जोडून आलेल्या सुट्ट्या यांमुळे बरेच जण बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे. चाचण्यांचे प्रमाण कमी झाले की नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही थोडी कमी होते. परंतु बाधितांचे प्रमाण मात्र अजूनही दीड टक्क्यांपर्यंत आहे. ज्यावेळी बाधितांचे प्रमाण वाढेल त्यावेळी मात्र सावध होण्याची गरज आहे, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

सणांच्या काळात चाचण्या कमी होतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. नवरात्रोत्सवातही चाचण्या कमी झालेल्या आहेत. दिवाळीमध्येही पुन्हा हीच स्थिती असण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या निमित्ताने गर्दी वाढणार असल्यामुळे आता परत चाचण्या वाढविल्या जातील.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका