मुंबई: महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या एका कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर मलबारहिल पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांला नुकतीच अटक केली आहे. आरोपीने केसरकर यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे.
प्रदीप भालेकर असे अटक करण्यात आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे नाव आहे. त्याच्यावर खंडणी, धमकी आणि गुन्हेगारी धमकीचा आरोप करत मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केसरकर यांची आरोपीसोबत दोन-तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपी वारंवार त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
आरोपीला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला याप्रकरणी बुधवापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह मुंबई पोलिसांविषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी भालेकरला यापूर्वी अटक झाली होती.