विद्याविहार आणि घाटकोपर रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवारी सकाळी धीम्या मार्गावर ठाण्याकडे जाणाऱ्या गाडीचा पेंटोग्राफ अचानक तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सकाळी सात वाजता विद्याविहार स्थानकाच्या पुढे काही अंतरावर गाडी गेली आणि अचानक पेंटोग्राफ तुटला आणि गाडी बंद पडली. यामुळे ओव्हरहेड वायरचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे मागील दोन गाडय़ा मार्गातच खोळंबल्या. मध्य रेल्वेने माटुंगा आणि मुलुंडदरम्यान सर्व वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली होती. सुमारे अर्धा तासाने वाहतूक पूर्ववत झाल्याचे सांगण्यात आले.