मुंबई : वाहतूक व्यवस्थेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा दक्षिण मुंबईतील प्रभादेवी पुलाचे पाडकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करणार आहे. एमएमआरडीए या पुलाच्या जागी नवीन दुमजली पूल (डबलडेकर पूल) उभारणार आहे. फेब्रुवारीमध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद करून त्याचे पाडकाम करण्यात येणार होते. मात्र अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी बंद करून पाडकाम करण्यास वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पुलाच्या पाडकामाला विलंब होत आहे. वाहतूक पोलिसांकडून परवानगी केव्हा मिळणार याकडेच एमएमआरडीएचे लक्ष लागले आहे.
नरिमन पॉइंट, वरळीतून अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूला थेट आणि अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीए शिवडी – वरळी उन्नत मार्गाचे बांधकाम करीत आहे. हा उन्नत मार्ग प्रभादेवी उड्डाणपुलावरून जाणार आहे. सुमारे १२५ वर्षे जुना प्रभादेवी पूल धोकादायक बनला असून तो पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्याची गरज आहे. ही जबाबदारी एमएमआरडीएने स्वीकारली आहे. त्यानुसार शिवडी – वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत या पुलाचे पाडकाम करून त्या जागी नवीन दुमजली पूल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. १३२ मीटर लांबीचा आणि २७ मीटर उंचीचा असा हा दुमजली पूल असणार आहे. सध्याच्या पुलाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या दुमजली पुलाच्या पहिल्या मजल्यावरून आतासारखीच वाहतूक सुरू राहणार आहे. तर दुसऱ्या मजल्यावरून अटल सेतूच्या दिशेने वाहतूक होणार आहे. स्थानिक वाहतुकीसाठी पुलाच्या पहिल्या मजल्याच्या दोन्ही टोकांना जोडरस्ता (ॲप्रोच रोड) असणार आहे. १५६ मीटर लांबीचा एक जोडरस्ता परळच्या, तर २०९ मीटर लांबीचा जोडरस्ता वरळीच्या दिशेने जाणार आहे. या दुमजली पुलाच्या बांधकासाठी अंदाजे १६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, प्रभादेवी पुलाचे पाडकाम करून दुमजली पुलाच्या बांधकामास सुरुवात होणे गरजेचे होते. मात्र काही अडचणींमुळे विलंब झाला असला तरी आता शक्य तितक्या लवकर या पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
फेब्रुवारीत पुलाचे पाडकाम करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीएने वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र आदित्य ठाकरे यांनी त्यास आक्षेप घेत इयत्ता १० वी, १२ वीच्या परीक्षा झाल्यानंतर पुलाचे पाडकाम करावे अशी मागणी केली. त्यामुळे फेब्रुवारीत एमएमआरडीएला परवानगी मिळाली नाही. आता मार्च महिन्याचा पंधरवडा उलटून गेला असून १० वी, १२ वीच्या परीक्षाही लवकरच संपणार आहे. मात्र अद्यापही एमएमआरडीएला परवानगी मिळालेली नाही. पूल बंद केल्याने काय परिणाम होईल आणि वाहतूक पर्यायी मार्गाने कशी वळवावी लागेल याचा अभ्यास केल्यानंतरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. पण ही परवानगी नेमकी केव्हा मिळणार याकडे एमएमआरडीएचे लक्ष लागले आहे. पावसाळ्यापूर्वी पाडकाम पूर्ण करून उर्वरित कामे सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुलाच्या पाडकामासाठी लवकरात लवकर परवानगी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, प्रभादेवी पूल वाहतुकीस बंद करून पाडकामास परवानगी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती वाहतूक पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. एकूणच पुलाच्या पाडकामासाठी विलंब होण्याची चिन्हे आहेत.