वाढीव खर्च कमी दाखविण्याच्या हालचाली!

‘बीडीडी’ चाळ पुनर्विकासाबाबत उपाध्यक्षांच्या समितीच्या अहवालास विलंब

(संग्रहित छायाचित्र)

निशांत सरवणकर

गेली चार वर्षे संथगतीने सुरू असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या आराखडय़ात विद्यमान महाविकास आघाडी सरकारने बदल सुचविल्यामुळे खर्चात दोन ते अडीच हजार कोटींची वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता या खर्चात फारशी वाढ होत नसल्याचे दाखविण्याचा आटापिटा सुरू आहे. या प्रकरणी म्हाडा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेल्या मुदतीत आपला अहवाल सादर केला नसल्यामुळे शंकेला वाव असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीडीडी चाळींच्या वरळी येथील प्रकल्पासाठी म्हाडाने टाटा समूहाला ११ हजार ७४४ कोटींचे, तर ना. म. जोशी मार्ग व नायगाव येथील प्रकल्पासाठी शापुरजी पालनजी व एल अँड टी या कंपन्यांना अनुक्रमे दोन हजार ४३६ कोटी आणि दोन हजार ९०३ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. आराखडय़ात सुचविण्यात आलेल्या बदलामुळे कंत्राटाचा खर्च २० ते २५ टक्क्यांनी वाढेल, असे पत्र या तिन्ही कंपन्यांनी म्हाडाला दिले आहे.

नायगाव प्रकल्पातून माघार घेतलेल्या एल अँड टी या कंपनीने पुन्हा या प्रकल्पात रस दाखविला आहे. मात्र हा खर्च फक्त पाच टक्के इतकाच वाढवून मिळू शकतो, अशी म्हाडाची भूमिका आहे. परंतु, या कंपन्यांना ते मान्य नाही.

कंपन्यांनी वाढवून मागितलेली रक्कम पाहता या पुनर्विकासाचा वाढीव खर्च दोन ते अडीच हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मात्र तसे झाले तर विरोधकांकडून कोंडी होईल वा कुणी न्यायालयात गेल्यास प्रकल्प रखडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आठवडय़ाभरात सादर होणारा अहवाल तयार असला तरी तो अद्याप सादर करण्यात आलेला नाही. अतिरिक्त वाढीव खर्च कमी दाखविण्यासाठी संबंधित म्हाडा अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. मात्र खर्च कमी दाखविला तरी त्या खर्चात या कंपन्या तयार होण्याची शक्यता नसल्याचे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

आराखडय़ातील नव्या बदलानुसार, पुनर्वसनाची इमारत पूर्वी २२ मजली होती. या इमारतीच्या तळघरात तीन मजली वाहनतळ उभारण्यात येणार होते. परंतु ती आता ४० मजली करण्याचे सुचविण्यात आले आहे. याआधी २२ मजली इमारतीत जाण्याबाबत रहिवाशांनी आक्षेप घेतला होता. तेव्हा म्हाडाने बैठका घेऊन लोकांची समजूत काढली होती. २२ मजल्यांवरील घरे आम्हाला नको, अशी मागणी आता काही रहिवासी करीत आहेत.

याआधी संक्रमण शिबीर बांधून काही रहिवाशांना स्थलांतरित करून पुनर्वसनाच्या इमारती बांधल्या जाणार होत्या. आता संक्रमण शिबीर न बांधण्याचे ठरविण्यात आले आहेत. याशिवाय वाहनतळासाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे. त्यामुळेच खर्चात वाढ होणार असल्याचेही म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

‘सेलेब्रिटी’ वास्तुरचनाकारासाठी ..

बीडीडी चाळींसाठी वास्तुरचनाकार निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सहाव्या क्रमांकावर असलेल्या एका सेलेब्रिटी वास्तुरचनाकाराला या प्रकल्पात पुन्हा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा वास्तुरचनाकार म्हाडाच्या मुख्य अभियंत्यांशी उघडपणे चर्चा करीत आहे. सरकारकडून असलेल्या पाठिंब्यामुळेच हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला वेग यावा असाच शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठीच समितीला अहवाल देण्यास सांगितले आहे. सांगोपांग विचार करूनच निर्णय घेतला जाणार आहे.

– जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Delay in the report of the vice chairman committee on bdd chaal redevelopment abn

ताज्या बातम्या