मुंबई : वंश वाढवण्याच्या दृष्टीने मृत्यू पावलेल्या अविवाहित मुलाचे गोठवलेले वीर्य जतन करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणाऱ्या महिलेच्या याचिकेची उच्च न्यायालयाने नुकतीच दखल घेतली. तसेच पुढील सुनावणीपर्यंत याचिकाकर्तीच्या मृत मुलाचे गोठवलेले वीर्य जतन करण्याचे अंतरिम आदेश प्रजनन उपचार केंद्राला सेंटरला (फर्टीलिटी सेंटर) दिले.

मृत मुलाचे गोठवलेले वीर्य फर्टिलिटी सेंटरने देण्यास नकार दिल्यानंतर याचिकाकर्तीने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या एकलपीठानेही याचिकेची दखल घेऊन त्यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याचे वीर्य कसे जतन करायचे याबद्दल महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केल्याचे नमूद केले. तसेच, पुढील सुनावणीपर्यंत याचिकाकर्तीच्या मुलाचे गोठवलेले वीर्य नष्ट झाले तर याचिकेचा उद्देश निष्फळ ठरेल, त्यामुळे, पुढील सुनावणीपर्यंत याचिकाकर्तीच्या मृत मुलाचे गोठवलेले वीर्य जतन करावे, असे अंतरिम आदेश एकलपीठाने संबंधित फर्टिलिटी सेंटरला दिले.

याचिकाकर्तीच्या मुलाला कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर, त्याच्यावर उपचार कऱणाऱ्या कर्करोग तज्ज्ञांनी केमोथेरपीमुळे त्याच्या प्रजनन क्षमतेवर होणाऱ्या परिणामांबाबत सांगितले होते. तसेच, त्याला त्याचे वीर्य गोठवून ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, याचिकाकर्तीच्या मुलाने त्याचे वीर्य नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटरमध्ये जतन केले. मात्र, त्याने कुटुंबाशी चर्चा न करता, मृत्यूनंतर वीर्य नष्ट करण्याचा पर्याय निवडला. दरम्यान, १६ फेब्रुवारी रोजी याचिकाकर्तीच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर, याचिकाकर्तीने २४ आणि २६ फेब्रुवारी रोजी फर्टिलिटी सेंटरला ई-मेल पाठवून वीर्य नष्ट न करता गुजरातमधील एका आयव्हीएफ सेंटरला पाठवण्याची विनंती केली. मात्र, नोव्हा सेंटरने सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान नियमन (नियमन) कायद्यातर्गत न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगून याचिकाकर्तीच्या मुलाचे गोठवलेले वीर्य देण्य़ास नकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वीर्य हा मालमत्तेचा भाग मानला जातो आणि मृत व्यक्तीच्या पालकांना त्याचे कायदेशीर वारसदार मानले जाते. तसेच, वीर्य गोठवण्याच्या अर्जामध्ये वीर्य नष्ट करणे किंवा पत्नीकडे त्याचा ताबा देणे हे दोन पर्याय समाविष्ट होते, त्यातच मुलगा अविवाहित असल्याने त्याने वीर्य नष्ट करण्याचा पर्याय निवडला असावा, असा दावा याचिकाकर्तीने याचिकेत केला होता. तसेच, मुलाचे वीर्य जतन करण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती.