मुंबई : मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून राजकीय वातावरणही तापलेले असताना आता हे प्रदूषण ठरवणारी यंत्रणाच सदोष असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. तसेच भारतीय हवामान खात्याकडून ‘सफर’ अंतर्गत मुंबईत तयार करण्यात आलेली हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रांची जागा बदलण्याची मागणी करण्यात येत होती.  या केंद्रांची योग्य देखभाल करण्यात येत नसल्याचा मुद्दाही पुढे आला आहे.

पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत मुंबईतील विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येते. कचराभूमी आणि सर्वात वर्दळीच्या वाहतूक नाक्यांवरील हवेची गुणवत्ता स्वयंचलित वाहनामार्फत तपासली जाते. सफर मुंबई या उपक्रमाद्वारे या माहितीचे विश्लेषण करून अहवाल तयार केला जातो. त्यामुळे प्रदूषणासंदर्भात योजना आखण्यास माहिती उपलब्ध होत असते. मात्र, ही स्वयंचलित वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे कचराभूमी आणि सर्वात वर्दळीच्या वाहतूक नाक्यांवर ही गुणवत्ता केंद्रे आहेत. त्यामुळे या केद्रांची जागा बदलण्याची गरज असल्याची चर्चा विविध पर्यावरणीय चर्चासत्रांमधून पुढे येत होती. त्यातच ‘एमपीसीबी’नेही केंद्रीय प्रदूषण मंडळालाही नुकताच याबाबत अहवालही दिला होता.

हेही वाचा >>> ‘बीकेसी’ येथे मेट्रो ३च्या कंत्राटदाराला काम थांबवण्यासाठी पालिकेची नोटीस, प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप 

आयआयटीएमद्वारे स्थापित वातावरणीय वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे ही प्रदूषकांच्या स्रोताजवळ (ट्रॅफिक जंक्शन्स / कर्बसाइड / खेळाची मैदाने) असल्यामुळे शहरातील ‘हॉट स्पॉट्स’चे प्रतिनिधित्व करतात, परंतु सभोवतालच्या हवेच्या गुणवत्तेचे नाही. त्यामुळे मंडळाचे अधिकारी या स्थानकांना भेट देतात. भेटीदरम्यान आढळलेल्या त्रुटींच्या आधारे २६ ऑक्टोबर रोजी एमपीसीबीने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास अहवाल सादर केला. ज्यात स्थळांची पडताळणी होईपर्यंत ही स्थानके केंद्रीय नियंत्रण कक्षामधून ‘डिस्कनेक्ट’ करावीत, अशी विनंती करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आणि एमपीसीबीने या सर्व केंद्रांची पाहणी करून त्यांचा आढावा घेण्याचे ठरवले आहे. मात्र सफर या संस्थेकडून त्याला काहीच प्रतिसाद येत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या केंद्रांची कित्येक वर्षांत देखभालही केली जात नसल्यामुळे त्यांचे वाचन सदोष असल्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. काहीच प्रतिसाद संबंधित संस्थेने न दिल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.

तक्रार नोंदवण्यासाठी एमपीसीबीचे अ‍ॅप

मुंबई : मुंबई शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून खालावलेला आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाची तक्रार करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ई-कॅटलिस्ट अ‍ॅप उपलब्ध केले आहे. त्या माध्यमातून नागरिकांना आपल्या विभागातील प्रदूषणाची तक्रार करता येणार आहे.

मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावत असून मंडळाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई केली आहे. सर्व बांधकामांना मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. बांधकामे, रस्त्यांची कामे यामुळे मुंबईकर धुळीने हैराण झाले आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहेच त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.