गेल्या चार महिन्य़ांपासून केलेली मेहनत वाया जाण्याची मूर्तिकारांना भीती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : घरगुती गणपतींचे यंदा घरीच किंवा पुढच्या वर्षी माघ वा भाद्रपद महिन्यात विसर्जन करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केल्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून बहुसंख्य भाविकांनी दोन फुटांऐवजी कमी उंचीची गणेशमूर्तीची मागणी मूर्तिकारांकडे करण्यास सुरुवात के ली आहे. त्यामुळे घरगुती गणपतीसाठी तयार केलेल्या दोन फुटांच्या मूर्तीचे काय करायचे आणि आता कमी उंचीच्या गणेशमूर्तीची एकदम वाढलेली मागणी कशी पूर्ण करायची अशा पेचात मूर्तिकार पडले आहेत.

गणेशमूर्ती साकारण्यासाठी मंडप उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मूर्तिकार सातत्याने करीत होते. मात्र करोना विषाणू संसर्गामुळे मंडप उभारण्याची परवानगी देण्यास विलंब झाला. टाळेबंदीमुळे मूर्तिकारांना शाडूची मातीही उपलब्ध होत नव्हती. अखेर बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघ गुजरातमधून पाच टन शाडूची माती मागविली आणि ती मूर्तिकारांना उपलब्ध केली. माती मिळाली, पण जागा नसल्याने घडवलेल्या मूर्ती ठेवायच्या कुठे, असा प्रश्न मूर्तिकारांसमोर होता.

जागेअभावी ज्यांना मूर्ती साकारता आल्या नाहीत, त्यांनी खरेदी के लेली माती पावसात भिजून वाया गेली आहे. मात्र काही मूर्तिकारांनी अनेक समस्यांवर मात करीत शाडूच्या दोन फुटाच्या गणेशमूर्ती साकारल्या. भाविकांनी या मूर्ती घेण्याची तयारीही दर्शविली. पण पालिकेने घरगुती गणपतींचे घरीच किंवा माघ अथवा भाद्रपदमध्ये विसर्जन करावे, असे आवाहन पालिकेने आपल्या सुधारित नियमावलीत केले आहे. दोन फुटांची मूर्ती घरी विसर्जित करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे भाविक आता मूर्तिकारांकडे लहान मूर्तीची मागणी करू लागले आहेत.

गणेशोत्सव १८ दिवसांवर आला आहे. इतक्या कमी दिवसांमध्ये मोठय़ा संख्येने लहान गणेशमूर्ती साकारणे शक्य नाही. पण त्याच वेळी साकारलेल्या दोन फूट उंचीच्या मूर्ती भाविकांनी घेतल्या नाहीत, तर पुढील काळात त्या ठेवायच्या कुठे, या विवंचनेत मूर्तिकार असल्याची व्यथा बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर यांनी मांडली. काही राजकारण्यांनी आपापल्या मतदारसंघातील भाविकांना गणेशमूर्ती भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मूर्तिकारांच्या मूर्तीना मागणी कमी होत आहे. परिणामी, यंदा एकूणच मूर्तिकारांना मोठय़ा तोटय़ाला सामोरे जावे लागणार आहे, असे तोंडवळकर यांनी सांगितले.

करोनामुळे निर्माण परिस्थितीत आपल्याकडे ५० टक्के भाविकांनी मूर्तीची मागणी केली होती. मात्र आता दोन फुटांची मूर्ती घरी विसर्जन करणे शक्य नसल्यामुळे लहान मूर्ती द्यावी, अशी मागणी भाविक करीत आहेत. तितक्या लहान मूर्ती उपलब्ध नाहीत. आता त्या साकारणेही शक्य नाहीत. त्यामुळे भाविकांची मागणी कशी पूर्ण करायची असा प्रश्न आहे, असे प्रख्यात मूर्तिकार प्रदीप मादुसकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for small idols increased in ganesh festivals zws
First published on: 06-08-2020 at 01:42 IST