कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे गोदामांतील कांदाचोरीही वाढू लागल्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या कांद्याच्या सुरक्षेचा धसका घेतला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी त्यामुळे सुरक्षा पुरविणाऱ्या संस्थांकडे धाव घेतली असून एका व्यापाऱ्याने तर आपल्या गोदामात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवून घेतले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावाने प्रतिकिलो ८५ रुपयांपर्यंत किमतीचा उच्चांक गाठला आहे. कांद्यांच्या भाववाढीने गंभीर रूप धारण केले असताना शनिवारी सायनच्या प्रतीक्षानगर येथील एका व्यापाऱ्याच्या दुकानातून ७०० किलो कांद्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली. वडाळ्यातही कांद्याची चोरी झाली. यामुळे कांदा व्यापाऱ्यांना आपल्याजवळच्या कांदा साठय़ाची चिंता आहे. वरळीच्या गोपाळनगर येथील गुप्ता नावाच्या व्यापाऱ्याचा कांद्याचा मोठा व्यवसाय आहे. येथे त्यांचे गोदाम आहे. त्यांनी तात्काळ आपल्या गोदामात सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतले आहेत. तसेच खासगी सुरक्षारक्षक ठेवले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, कांद्याची चोरी होऊ शकेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. घाऊक बाजारातून कांदा आणून तो गोदामात ठेवतो. सध्याच्या काळात कांद्याची चोरी झाली तर ती परवडणारी नाही म्हणून हे सीसीटीव्ही लावले आहेत. एक दिवस सुरक्षारक्षक मागवले होते. आता गोदामाबाहेर आमचेच सुरक्षारक्षक चोवीस तास तैनात केले आहेत. सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्थांकडे कांदारक्षकपुरविण्याची मागणी होत आहे. रेंजर सिक्युरिटी या कंपनीचे संचालक समशेर सिंग यांनी सांगितले की, कांद्याच्या वाहतुकीसाठी सुरक्षारक्षक मागणारे फोन येऊ लागले आहेत. सुरुवातीला हे थोडे विचित्र वाटले होते. आम्ही परळच्या एका कांदे व्यापाऱ्याला ‘शॉर्ट टर्म सिक्युरिटी’ म्हणजेच दोन दिवसांसाठी सुरक्षारक्षक पुरवले होते. बाजारातून कांदे आणून ते गोदामात नेण्यापर्यंत तसेच गोदामाच्या बाहेरही आमचे सुरक्षारक्षक तैनात करण्यात येतात, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Aug 2015 रोजी प्रकाशित
कांदारक्षकांची मागणी वाढली
कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे गोदामांतील कांदाचोरीही वाढू लागल्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या कांद्याच्या सुरक्षेचा धसका घेतला आहे.

First published on: 26-08-2015 at 03:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand of security guard for onion increased