मुंबई : पावसाळ्याने जोर धरताच शहरात डासांचे साम्राज्य पुन्हा वाढले असून डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाने मुंबईकरांना हैराण केले आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या चार आठवड्यांतच या तिन्ही रोगांचे ४,५०० हून अधिक रुग्ण नोंदवले गेले असून खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्येही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे.
मलेरिया रुग्णांची संख्या गेल्या वर्षी २८५२ होती ती वाढून यंदा ४१५१ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. विशेषतः धारावी, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द आणि भायखळा परिसरांमध्ये अनियमित कचरा व्यवस्थापन व साचलेले पाणी यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे. एका वरिष्ठ पालिका आरोग्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “पाणी साचणाऱ्या ठिकाणी अॅनॉफिलिस डासांची उत्पत्ती वाढली असून तेच मलेरियाचा प्रमुख स्त्रोत आहेत. डेंग्यूचे रुग्ण गेल्या वर्षी ९६६ होते ते आज ११६० नोंदविण्यात आले आहेत तर चिकनगुन्याच्या रुग्णांची संख्या यंदा ८५० झाली आहे.
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. प्लेटलेट्स घटण्याचे प्रमाण व शारीरिक अशक्तपणा यामुळे रुग्णांना तातडीने हॉस्पिटलायझेशनची गरज भासत आहे. वांद्रे, अंधेरी, मलाड, कांदिवली या मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक आढळले आहेत. डेंग्यूची लक्षणे – उष्णतेसह ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आणि त्वचेवर रॅशेस – यामुळे नागरिक अधिक चिंतेत आहेत.
चिकनगुनियाचे पुनरागमन
सुमारे दोन वर्षांनी चिकनगुनियाचे रुग्ण पुन्हा शहरात आढळू लागले आहेत. यंदा आतापर्यंत ८५० हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी बऱ्याच जणांना संधीवातासारखी लक्षणे, तीव्र सांधेदुखी आणि थकवा जाणवत आहे. “सध्या चिकनगुनियावर उपचार नाहीत, फक्त लक्षणांवर आधारित उपचार करावा लागतो. त्यामुळे लोकांनी स्वतःहून दक्ष राहणे गरजेचे असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांनी सांगितले.
आरोग्य यंत्रणांचा आळस? महानगरपालिका दरवर्षी डास नियंत्रण मोहीम राबवत असली तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम फारसा जाणवत नाही. अनेक भागांत अद्याप दैनंदिन फॉगिंग होत नाही, साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने डासांच्या उत्पत्तीला खतपाणी मिळते आहे. पालिकेकडून काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, तसेच घरघरी जाऊन सर्वेक्षणही सुरु आहे. मात्र उपाययोजना अद्याप अपुऱ्या आहेत, अशी नागरिकांची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणती खबरदारी घ्यावी याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत.
साचलेले पाणी न ठेवणे ,झाकण असलेल्या भांड्यातच पाणी साठवणे ,मच्छरदाणीचा वापर तसेच लक्षणे आढळताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेच्यास सांगण्यात आले आहे. मुंबईतील पावसाळा केवळ ट्रॅफिक आणि पाणथळ रस्त्यांपुरता मर्यादित राहत नाही तर तो आरोग्याच्या दृष्टीनेही मोठे संकट उभे करतो. डासजन्य आजारांवर नियंत्रणासाठी पालिका यंत्रणा आणि नागरिक दोघांचीही सक्रिय भूमिका अत्यावश्यक आहे. अन्यथा येत्या आठवड्यांत ही साथ आणखी बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.