मुंबई : एका नामांकित शैक्षणिक संस्थेमधील लेखा विभागातील उपव्यवस्थापकाने १ कोटी ४४ लाख रुपयांचा अपहार केला. शुल्क परताव्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा न करता दुसऱ्याच खात्यात वळवली. लेखा परीक्षणाच्या अहवालातील संशयास्पद नोंदीमुळे हा घोटाळा उघडकीस आला. बांगूर नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी उपव्यवस्थापक ताहिर खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या देशभर शाळा आहेत. शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना तीने ते सहा महिन्यांचे शैक्षणिक शुल्क, तसेच बस, उपहारगृह आणि क्रीडा शुल्क भरावे लागते. एखाद्या विद्यार्थ्यांने शाळा मध्येच सोडली, तर प्रवेश रद्द करण्यात येतो, तसेच विद्यार्थ्याने क्रीडा उपक्रमातून माघार घेतल्यानंतर त्याला शुल्क परत केले जाते. याच शुल्क परताव्याच्या रकमेचा मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.
उपव्यवस्थापकाने केला अपहार
शुल्काच्या रकमेचा परतावा करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांची नावे एका महिला कर्मचाऱ्याकडे पाठवण्यात येत होती. ही महिला कर्मचारी संबंधित विद्यार्थ्यांचे बॅंक खाते तपासून त्यांची यादी तयार करीत होती आणि ही यादी लेखा विभागाचे उपव्यवस्थापक ताहिर खान याच्याकडे पाठवण्यात येत होती. त्यानंतर विद्यार्थ्यांची पेमेंट फाईल तयार करण्यात येत होते. या पेमेंट फाईलचे सर्व अधिकार ताहिर खान याच्याकडे होते. मात्र त्याने एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत हे पैसे संबंधित विद्यार्थ्यांना न पाठवता परस्पर दुसऱ्या खात्यात वळविले.
असा उघडकीस आला घोटाळा
मार्च महिन्यात संस्थेचे लेखा परीक्षण करण्यात येत होते. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याची तपासणी करण्यात आली. निलोफर शेख नामक महिलेच्या खात्यात अनेक वेळा पैसे हस्तांतरित झाल्याचे आढळले. लेखा विभागाचे प्रमुख पवन लोहिया (३४) यांना त्याबाबत संशय आला. या खात्यात तब्बल ४४ लाख ८६ हजार रुपये हस्तांतरित झाले होते. अधिक चौकशी केली असता ताहिर शेख याने संस्थेतून वेगवेगळ्या खात्यांवर तब्बल १ कोटी ४४ लाख रुपये वळते केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी लोहिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून बांगूर नगर पोलीस ठाण्यात ताहिर खान विरोघात फसणुकीप्रकरणी कलम ३१८ (४) आणि ३१६ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.