इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी येत्या पंधरा दिवसांत निविदा मागवल्या जाणार आहेत. या प्रकल्पासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली असून प्रकल्पाचा खर्च कमी करण्यासाठी हरित ऊर्जेवर भर देण्यात येणार आहे.
पालिकेने नि:क्षारीकरण प्रकल्पाची घोषणा करून दोन वर्षे उलटली असून हा प्रकल्प कधी मार्गी लागणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे. मनोरी येथे प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून निविदेचा मसुदाही तयार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्प उभारण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत निविदा मागवण्यात येणार आहेत.
मुंबईला दररोज सात धरणांतून ३८०० दशलक्षलिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागते. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पालिकेने मनोरी येथे नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा फेब्रुवारी २०२१ मध्ये केली होती. पालिकेत तेव्हा शिवसेनेची सत्ता असल्यामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव मंजूर केला होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये या प्रकल्पाची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला होता. जानेवारी २०२२ मध्ये या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यात आले होते. मात्र राज्यात सत्तांतरानंतर हा प्रकल्प मार्गी लागणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र आता या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पातही या प्रकल्पासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली असल्यामुळे यंदाच्या वर्षांत हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणावर वीज लागणार आहे. शुद्ध पाण्याच्या प्रती किलोलिटरसाठी सुमारे ताशी ४ किलोवॅट इतक्या विजेच्या आवश्यकता आहे. ही वीज एकतर सौरऊर्जा किंवा पवन ऊर्जा या स्वरूपात तयार केली जाणार आहे. त्यामुळे ऊर्जानिर्मिती हा या प्रकल्पाचा भाग असेल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी दिली.