मुंबई : शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, कला, क्रीडा, तंत्रज्ञान, औद्याोगिक, संशोधन, संरक्षण आदी विविध क्षेत्रांत प्रतिकूलतेवर मात करून अतुलनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांना ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२५’ने गौरवले जाणार आहे. समाजाभिमुख दृष्टिकोन मनात बाळगून इतरांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या स्त्रियांचा शोध सुरू झाला आहे. अशा प्रेरणादायी स्त्रियांचा सन्मान ‘लोकसत्ता’कडून दरवर्षी करण्यात येतो. यंदा या पुरस्काराचे १२वे वर्ष असून या पुरस्कारांसाठी नामांकने पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असतो. त्यासाठी समाजाला नवी दिशा, प्रेरणा देणाऱ्या आणि स्वत:ला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांची राज्यभरातून नामांकने मागवली जातात. अनेक जणी आगळ्यावेगळ्या किंवा पुरुषप्रधान क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतात, तर काही जणी समाजाची मानसिकता बदलण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्याही असतात. या पुरस्कारासाठी तुमची माहिती किंवा तुमच्या परिचयातील कर्तबगार आणि ध्येयनिष्ठ स्त्रियांची माहिती लवकरात लवकर पाठवावी. तज्ज्ञ परीक्षकांची समिती आलेल्या नामांकनांतून दुर्गांची निवड करते. ‘दुर्गां’च्या निवडीनंतर दरवर्षीप्रमाणे नवरात्रीत दररोज एका दुर्गेची ‘लोकसत्ता’मधून ओळख करून दिली जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या शानदार संगीतमय सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते दुर्गांचा सन्मान केला जाणार आहे.

नामांकने पाठवण्यासाठीचे काही नियम –

काय अपेक्षित?

– दुर्गा पुरस्कारासाठी स्त्रियांची माहिती जास्तीत जास्त ५०० शब्दांत पाठवावी. संबंधित स्त्रीचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे असावे.

– माहिती मुद्द्यांच्या स्वरूपात आणि थोडक्यात असल्यास उत्तम. त्यामुळे निवड प्रक्रिया सहज होते. निवड झालेल्या स्त्रियांकडून नंतर अधिक माहिती मागवली जाईल.

– नामांकन पाठवताना एकाच ई-मेलमध्ये त्या स्त्रीचे छायाचित्र, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक.

– एका व्यक्तीसाठी फक्त एकच ईमेल पाठवावा. जास्त ईमेल्सचा विचार केला जाणार नाही.

– इंग्रजीमधून पाठवलेले नामांकन बाद ठरवले जाईल.

– व्हिडीओ, यूट्यूब लिंक्स किंवा इतर कोणत्याही लिंक्स पाठवू नयेत.

– अंतिम निवडीसाठी परीक्षकांचा निर्णय बंधनकारक राहील.

माहिती कुठे पाठवाल?

नामांकने फक्त loksattanavdurga@gmail. com या ई-मेल आयडीवर पाठवावीत. त्याबाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

सहप्रायोजक टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड

वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स

चितळे डेअरी

ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड