मुंबई : कंपवाताची (पार्किन्सन्स) लक्षणे सुरुवातीच्या काळात ओळखणे अवघड असते. त्यामुळे हा आजार नकळतपणे वाढत जातो. अनेकदा आजाराची स्थिती अधिक गंभीर होईपर्यंत आजाराचे निदान होऊ शकत नाही. त्यामुळे उपचार निष्फळ ठरण्याचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेता भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई, (आयआयटी मुंबई) व ऑस्ट्रेलियातील मोनॅश युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी कंपवाताचे पहिल्या टप्प्यात निदान करण्यासाठी एक अभिनव पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे आता या आजाराचे निदान वेळेत होणे शक्य होणार आहे.

या आजाराचा मुख्य परिणाम मेंदूतील चेतापेशींवर (न्युरॉन्स) होत असून यात मेंदूमधील डोपामिनर्जिक न्यूरॉन्स म्हणजेच डोपामाइन-उत्पादक पेशींचा हळूहळू ऱ्हास होत जातो. त्यामुळे डोपामाइन तयार होण्याची क्षमता कमी होते. डोपामाइन हे एक संप्रेरक (हार्मोन) आणि चेतापारेषक (न्यूरोट्रान्समिटर) आहे. हे रसायन मेंदूच्या चेतापेशींना एकमेकींशी संवाद साधायला मदत करते. स्नायूंच्या हालचाली सूत्रबद्ध पद्धतीने होणे, तसेच भावस्थिती (मूड), स्मृती, झोप, ग्रहणक्षमता अशा मेंदूच्या इतर कार्यांवर नियंत्रण राहणे यामध्ये डोपामाइन अतिशय महत्वाची भूमिका बजावते. डोपामिनर्जिक पेशींचा ऱ्हास झाल्याने डोपामाइनचे उत्पादन कमी होते. परिणामतः व्यक्तीच्या अवयवांच्या हालचाली तसेच मेंदूच्या इतर कार्यांवर दुष्परिणाम होतो. हा आजार गंभीर होत जातो तशी प्राथमिक टप्यात अधूनमधून जाणवणारी कंपवाताची लक्षणे सातत्याने दिसू लागतात. लक्षणे ठळकपणे जाणवेपर्यंत मेंदूतील ५० ते ८० टक्के डोपामाइन उत्पादक पेशी निकृष्ट झालेल्या असतात.

हेही वाचा >>>गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई, (आयआयटी मुंबई) व ऑस्ट्रेलियातील मोनॅश युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी कंपवाताचे प्रारंभिक टप्प्यात निदान करण्यासाठी एक अभिनव पद्धत विकसित केली आहे. या नव्या पद्धतीनुसार व्यक्तींच्या चालण्याच्या ढबीमधील सूक्ष्म बदलांचे व विसंगतींचे त्यांनी प्रस्थापित गणिती साधने वापरून विश्लेषण केले. या विश्लेषणावरून आजाराची लक्षणे स्पष्ट दिसू लागण्यापूर्वीच कंपवाताची शक्यता सहजपणे ओळखण्यात यश आले आहे. संशोधकांनी त्यांचे एकूण १६६ सहभागी रुग्णांच्या आधारे त्यांचे प्रारूप पडताळून पाहिले. त्यातील ८३ रुग्ण आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यांत होते तर १० रुग्ण मध्यम टप्यात होते. तसेच, ७३ निरोगी व्यक्ती होत्या, ज्यांचे नियंत्रण गट म्हणून नियोजन केले गेले. संशोधकांनी फिजिओनेट डेटाबेस नावाच्या माहितीसंग्रहामध्ये संकलित केलेली तीन वेगवेगळ्या अभ्यासांमधील रुग्णांची चालण्याच्या पद्धतीची माहिती वापरली. संशोधकांना असे दिसले की या प्रणालीमुळे कंपवाताच्या शक्यतेचा ९८ टक्के अचूक अंदाज लावता आला. त्यातील ८९ टक्के रुग्ण प्राथमिक टप्प्यात होते. संशोधकांच्या मते शारीरिक हालचालींवर परिणाम करणारे आणि मेंदूच्या ऱ्हासाशी निगडीत असलेले इतर आजार ओळखण्यासाठीही ही पद्धत वापरता येईल.

हेही वाचा >>>विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली

कंपवाताची लक्षणे

अवयवांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचाली मंदावणे, स्थिर न राहता येणे अशी प्रमुख लक्षणे दिसून येतात. आजार बळावल्यावर तोल जाणे, सूत्रबद्ध हालचालींमध्ये अडचणी येणे तसेच निद्रनाश, अस्थिर भावस्थिती आणि आकलन होण्यात अडचण येणे अशी लक्षणेही दिसतात.

कंपवात या आजारात रुग्णाला कमकुवत करणारा आणि सर्वाधिक दिसणारा परिणाम म्हणजे व्यक्तीच्या चालण्याची ढब बिघडणे. त्यामुळे, हे कंपवाताचे सुरुवातीचे लक्षण असू शकते असे गृहीत धरून चालण्याच्या पद्धतीत अधूनमधून दिसणारी विसंगती शोधण्यासाठी आम्ही डीटीडब्ल्यू या सामाईक गणिती प्रणालीचा (अल्गोरिदम) वापर केला.- पार्वती नायर, संशोधक, आयआयटी मुंबई-मोनॅश रीसर्च अकादमी