राज्य सरकार अनेक आघाडय़ांवर शर्थीचे प्रयत्न करीत असूनही आणि जनहिताचे अनेक चांगले निर्णय घेत असूनही प्रसिध्दीमाध्यमांमधून सरकारबाबत नकारात्मक प्रसिध्दी मिळत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिंतेमध्ये आहेत. मंत्री, सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून सरकारची बाजू सकारात्मकपणे प्रसिध्दीमाध्यमांमध्ये येईल, यासाठी पावले टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला पुढील महिन्यात दोन वर्षे होत आहेत. या कालावधीत राज्य सरकारला अनेक मुद्दय़ांवर बरेचदा प्रसिध्दीमाध्यमांमध्ये टीकेला व नकारात्मक प्रसिध्दीला सामोरे जावे लागले. सरकारने केलेल्या उपाययोजना व निर्णय याबाबत ज्या नकारात्मक बातम्या व लेख प्रसिध्दीमाध्यमांमध्ये येतात किंवा टीका येते, त्याविरोधात संबंधित विभागाने लगेच दुपापर्यंत मुद्देसूद स्पष्टीकरण तयार करुन प्रसिध्दीमाध्यमांना पाठवावे व त्याची प्रत मुख्यमंत्र्यांकडे पाठवावी, असे निर्देश आधीच दिले आहेत. पण तरीही त्याचे फारसे पालन केले जात नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस चिडले आहेत व त्यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे.  त्यामुळे आता नव्याने निर्देश जारी करण्यात येत असून प्रसिध्दीमाध्यमांमधून सरकारची बाजू सुस्पष्टपणे मांडली जावी, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जावा व अन्य उपाययोजनाही करण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या जाणार आहेत.