महाराष्ट्राच्या सामाजिक व आíथक विकासात सहकाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाने नेहमीच सहकाराच्या वाढीसाठी प्रयत्न केले. परंतु काही वाईट प्रवृत्तींमुळे सहकार क्षेत्र बदनाम झाले आहे. अशा प्रवृत्तींना नेस्तनाबूत करून सहकाराचे शुद्धीकरण करण्यासाठी शासन कडक कायदे करीत आहे. सहकाराचा वापर स्वाहाकारासाठी करणाऱ्यांना कदापि माफ केले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्यातील सहकार सम्राटांना दिला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि मुंबई सहकारी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सहकार संस्कार परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबै बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार राज पुरोहित, आशीष शेलार, मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अशोक गोंदुकुपे आदीं उपस्थित होते.
विना सहकार नही उद्धार म्हणत सुरू झालेल्या सहकार चळवळीचा मागील काळात स्वाहाकार झाला. काही लोकांनी सचोटीने काम करण्याऐवजी ‘सहकारातून स्वाहाकार’ करण्याचे धोरण अवलंबिले. अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा होण्यासाठी आणि सहकाराच्या शुद्धीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतल्यानंतर ज्यांनी संस्था बुडविल्या तेच आज सहकार बुडविणारे सरकार म्हणून आमच्यावर टीका करीत आहेत. मात्र काहीही झाले तरी घोटाळेबाजांना त्यांची जागा निश्चितपणे दाखविली जाईल. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी शासन नेहमीच राहील.
सहकाराच्या वाटचालीसाठी कृतीदल
सहकारातील सध्याच्या समस्या आणि भविष्याच्या वाटचालीचा विचार करून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. सहकारातील स्वाहाकार संपवून संस्कार रुजविण्यासाठी या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांचा टास्क फोर्स तयार करण्यात येणार असून तो सहकारासमोरील अडचणींचा विचार करून पुढील वाटचालीचा रोडमॅप करेल असेही त्यांनी सांगितले.
