मुंबई : नागपूर आणि मुंबईला द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी मुंबई-नागपूर महामार्ग बांधण्याचे स्वप्न आम्ही पाहिले. पण हा महामार्ग होणार की नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. रस्ता होणारच नाही असेच अनेक जण सांगत होते. पण त्या वेळी एक व्यक्ती मात्र पहिल्या दिवसापासून महामार्ग होणार यावर ठाम होती. ती व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ मिळाली. सर्व प्रकारची मदत पंतप्रधानांनी दिली आणि हा महामार्ग तयार झाला आहे. महामार्ग तयारच झाला नाही तर आज ज्या दोन व्यक्तींमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात आला आहे, त्याच पंतप्रधानांच्या हस्ते आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालात प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे. हे दोघेही नसते तर ‘समृद्धी’ महामार्ग झालाच नसता, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जमीन अधिग्रहण अवघड

या प्रकल्पात जमीन अधिग्रहण हे सर्वात मोठे अवघड काम होते. मात्र आमच्या सरकारने आणि विशेषत: शिंदे यांनी एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून पुढाकार घेतला. त्याला केंद्राची साथ मिळाली आणि केवळ नऊ महिन्यांत, विक्रमी वेळेत जमीन अधिग्रहणाचे अवघड काम यशस्वीपणे पेलले. शेतकऱ्यांची मने वळवली. केंद्राच्या मदतीने ५० हजार कोटींचे कर्ज मिळवीत प्रकल्पही मार्गी लावला. या प्रकल्पाचे लोकार्पण केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे अशी आमची इच्छा होती. ती पूर्ण झाली असून हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा असल्याचे या वेळी फडणवीस यांनी सांगितले.

नागपुरातूनही आता वंदे भारतएक्स्प्रेस

नागपूर : अत्याधुनिक सुविधांनी युक्त आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरला उपलब्ध झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर या गाडीला हिरवी झेंडा दाखवून लोकार्पण केले. ही ‘सेमी हाय स्पीड’ गाडी नागपूर-बिलासपूर दरम्यान धावणार आहे. फलाट क्रमांक १ वर सकाळी पावणेदहा वाजता ही गाडी बिलासपूरकडे रवाना झाली. तत्पूर्वी त्यांनी गाडीतील सुविधांची पाहणी केली. तसेच या प्रवाशांशी संवाद साधला. ही देशातील अशा प्रकारची सहावी गाडी असून मध्य भारतातील पहिलीच गाडी आहे.

समृद्धी होऊ नये असे अनेकांना वाटत होते -मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होत आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी आम्हाला  सर्व मदत केली. त्यामुळे त्यांच्याच हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होत असल्याने याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे. या प्रकल्पाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याने त्याचा आनंद असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणारा प्रकल्प ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच फडणवीस आणि माझ्या काळात सुरू झालेला प्रकल्प आमच्याच काळात पूर्ण होत असल्याचाही आनंद होत आहे. मात्र त्याच वेळी हा प्रकल्प होऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्नशील होते, असा आरोप करून त्यांनी विरोधकांवर टीका केली. शेतकऱ्यांबरोबर बैठका घेतल्या जात होत्या. शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि हा प्रकल्प पूर्णत्वास जात असल्याचेही ते या वेळी म्हणाले.

प्रकल्पाचे एकूण ८८.१९ टक्के काम पूर्ण

मुंबई ते नागपूर अशा ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाचे ३० नोव्हेंबपर्यंत ८८.१९ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित कामाला गती देऊन ७०१ किमीचे काम जुलै २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कामास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. त्याला एमएसआरडीसीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

विद्यार्थ्यांशी संवाद; मेट्रो-१ चे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नागपूर मेट्रो टप्पा-१ चे लोकार्पण, तर टप्पा-२ चे भूमिपूजन पार पडले. मोदी यांनी सकाळी फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकाला भेट दिली. या स्थानकातून मेट्रोमध्ये प्रवासापूर्वी त्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे अवलोकन केले आणि या वेळी प्रदर्शित केलेल्या ‘सपनों से बेहतर’ या प्रदर्शनालाही भेट दिली. 

शेजारच्या राज्यांनाही महामार्गाने जोडणार – गडकरी

समृद्धी महामार्ग विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि तेथील विकासाला चालना देणारा ठरणार आहे. या प्रकल्पास फडणवीस यांनी सुरुवात केली आणि एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाची जबाबदारी घेतली. या दोघांच्या मदतीने एमएसआरडीसीने हा प्रकल्प मार्गी लावला. आज या प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होत आहे. तेव्हा शिंदे, फडणवीस आणि एमएसआरडीसी कौतुकास पात्र असल्याचे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. तर समृद्धीने सध्या १० जिल्हे आणि ३९२ गावे जोडली आहेत. पुढे समृद्धीच्या विस्ताराच्या माध्यमातून आणि इतर द्रुतगती महामार्गाच्या जाळय़ाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र जोडला जाणार आहे. पुढे राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून शेजारच्या राज्यांनाही समृद्धी महामार्ग जोडण्यात येणार असल्याचे या वेळी गडकरी यांनी सांगितले.

समृद्धीची वैशिष्टय़े

* नागपूर ते मुंबई असा ७०१ किमीचा सहा पदरी महामार्ग

* खर्च अंदाजे रु. ५५ हजार कोटी

* राज्यातील १० जिल्हे आणि ३९० गावांना जोडणारा महामार्ग

* मुंबई ते नागपूर अंतर केवळ आठ तासांत होणार पूर्ण होणार

* प्रकल्पासाठी एकूण २०८२० हेक्टर जमिनीचे  संपादन – त्यापैकी ८५२०  हेक्टर जागेचा वापर

* तर १०१८० हेक्टर जागेवर टाऊनशिप

* एकूण २४ छेदमार्ग (इंटरचेंजेस)

* वेगमर्यादा ताशी १५० किमी

* पण प्रत्यक्षात ताशी १२० किमीने प्रवास

* २६ टोल नाके

* १.७३ रुपये प्रति किमी टोल

* यातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा रविवारपासून सेवेत

* १० तासांऐवजी आता ५ तासांत प्रवास

* ५२० किमी अंतरात १९ टोलनाके, १९ छेदमार्ग

* ५२० किमीसाठी ९०० रुपये टोल

विकासकामांना गती..

* हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उद्घाटन

* नागपूर मेट्रो टप्पा-१ लोकार्पण

* नागपूर मेट्रो टप्पा-२ भूमिपूजन

* नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस शुभारंभ

* नागपूर आणि अजनी रेल्वे पुनर्विकास शुभारंभ

* अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर राष्ट्राला समर्पित

* नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प भूमिपूजन

* सेंटर फॉर स्कीलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (सपेट), चंद्रपूर लोकार्पण

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis gave credit to shinde modi for maharashtra samruddhi mahamarg zws
First published on: 12-12-2022 at 02:17 IST