‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घरबांधणी क्षेत्राशी संबंधित परिषदेत (रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली आहेत. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांना जे प्रश्न विचारले त्यावर त्यांनी उत्तरं दिली.
म्हाडाबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
म्हाडाचा आकार लक्षात घेतला किंवा त्यांचा प्रभाव जितका दिसायला हवा तितका दिसत नाहीत. हजारो फाईल्स म्हाडामध्ये पडून आहेत अशीही चर्चा कानावर येते. याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे काही सत्य नाही. दोन गोष्टी असतात. म्हाडाने स्वतः तयार करायच्या योजना. त्या योजना मर्यादित आहेत. मुंबईत डेव्हलपमेंट करण्याचं काम म्हाडा करते. गेल्या दोन ते अडीच वर्षांत खूप मोठ्या प्रमाणात म्हाडाला चालना दिली आणि पुनर्विकासाचे प्रकल्प आपण मोठ्या प्रमाणावर सुरु केले. पत्रा चाळ हे प्रकरण सगळ्यांनाच माहीत आहे. ज्यामुळे मराठी माणूस इतकी वर्षे झोपडपट्टीत राहायला गेला त्यांचं काम आपण म्हाडाच्या मार्फत पूर्ण केलं. अभ्युदय नगर सारखा भाग जो खऱ्या अर्थाने मिल कामगारांचा किंवा चाळीत राहणाऱ्यांचा होता त्याचा पुनर्विकास सुरु केला. मोतीलाल नगरचा पुनर्विकास सुरु केला. हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत कारण त्यात मोठ्या प्रमाणात पुनर्विकास होतो आहे. जे लोक त्या ठिकाणी आहेत त्यांना अतिरिक्त जागा मिळेल आणि घरांचीही निर्मिती होणार आहे. यातलं सर्वात मोठं उदाहरण बीडीडी चाळ आहे. हा प्रकल्प जवळपास चाळीस वर्षे रखडला होता. मी मुख्यमंत्री असताना हे स्पष्ट केलं की हा प्रकल्प म्हाडाच्या अंतर्गत करायचा. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही योजना कागदावर ठेवलेल्या नाहीत-फडणवीस
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज १२० फुटांमध्ये राहाणाऱ्या माणसाला ५०० फुटांचं, ५४० फुटांचं घर मिळतं आहे. आता काही कागदावर योजना राहिली नाही. आम्ही ती घरं सुपुर्दही केली. इतकं चांगलं बांधकाम करण्यात आलं आहे की या पुनर्विकासातून उभ्या राहिलेल्या इमारती आहेत असं कुणी म्हणू शकणार नाही. आपण हे सगळे प्रकल्प पाहिले तर नवं मॉडेल आणलं आहे ते आम्ही क्लस्टर म्हणून विकसित करत आहोत. सुरुवातीला एसआरएमध्ये जे काम केलं ते म्हणजे आडव्या झोपडपट्ट्या उभ्या केल्या. आपण त्यांना सोयी-सुविधा दिल्या नाहीत. सुरुवातीचे एसआरए प्रकल्प पाहिले तर त्यात साधा हवा खेळती राहिल याचाही विचार केला गेला नाही.लोकांना सूर्य दिसेल अशी व्यवस्थाच केली गेली नव्हती. या सगळ्यातही आपण बदल केला. आता मोठ्या योजना आपण हाती घेतल्या आहेत. त्यामुळे पुनर्विकास होतो आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात बदल होतो आहे.”
घरांच्या किंमती कमी करण्यासाठी प्रय़त्न-फडणवीस
म्हाडाच्या सोडती या म्हाडाने बांधलेल्या घरांच्या सोडती असतात. मागणी आणि पुरवठा यांचातली पोकळी भरली तरच घरांच्या किंमती आवाक्यात येतील. या योजनांमधून घरांचा स्टॉक तयार होणार आहे. नवी मुंबईत एक लाख घरं बांधली. PMAY च्या माध्यमातून घरं बांधली. किंमती हा विषय आहे तर आसपासच्या खासगी विकासकांपेक्षा किंमती परवडणाऱ्या आहेत. आता आमच्या प्रकल्पांत तोट्यात जाऊन कमी किंमतीत घरं विकण्यात काही अर्थ नसतो. सध्या एका फ्लॅटसाठी आठ अर्ज येत आहेत. याचा अर्थ लोकांना किंमत परवडते आहे म्हणून ते येत आहेत. तरीही किंमती कशा करता येतील याचा विचार आम्ही करतो आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.