मुंबई : ‘विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा सभागृहात यावे यासाठी माझ्या शुभेच्छा. मी असे म्हटल्यावर उध्दव ठाकरे म्हणतील की आम्ही त्यांच्या माणसांची पळवापळवी करतो. २०२९ पर्यंत आम्हाला तिकडे (विरोधी पक्षात) येण्यास कोणतीच संधी नाही. पण तुम्हाला इकडे येण्याची संधी आहे. त्याचा विचार वेगळ्या पध्दतीने करु’ अशी टिप्पणी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांना विधान परिषदेत खुले निमंत्रण दिले. त्यावर अशा गोष्टी खेळीमेळीने घ्यायच्या असतात, असे प्रत्युत्तर देत ठाकरे यांनी याला फारसे महत्त्व दिले नाही.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे २९ ऑगस्ट रोजी विधानपरिषद सदस्य म्हणून निवृत्त होत आहेत. त्यांना विधानपरिषदेत बुधवारी निरोप देण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात विरोधकांना चिमटे काढले. दानवे हे १५ वर्षे भाजपमध्ये होते. ते एक प्रभावी नेतृत्व आहे. भाजपमधून ते आमच्या एकेकाळच्या मित्रपक्षात गेले. आजही तो (ठाकरे पक्ष) मित्रपक्ष आहे. त्यांच्यात थेाडे बदल झाले आहेत. त्यांना सत्तेत येण्याची संधी आहे. पण आम्हाला २०२९ पर्यंत विरोधी पक्षात जाण्यात आता स्कोप उरलेला नाही, अशी मल्लीनथी फडणवीस यांनी केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी जोपर्यंत युवा नेते आहेत. तोपर्यंत दानवे आणि मी युवा नेते राहू शकतो असे सांगून दानवे हे एक अभ्यासू, चिकाटी आणि संघटन कौशल्य असलेले नेते आहेत असे गौरोद्वागर फडणवीस यांनी काढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकर स्मारकाला जागा दिली होती. त्यांचा कधीही सावरकरांना विरोध नाही असेही फडणवीस यांनी सांगितले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकर यांचे कौतुक करणारे पत्र दिले होते. हे राहुल गांधी यांना कोणीतरी सांगाण्याची गरज आहे, असा टोला फडणवीस यांनी मारला.

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्याचा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हे उशिरा सुचलेले शहाणपण होते. हा निर्णय घेतला ती बैठक बेकायदेशीर होती. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचे खरे श्रेय हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.दानवे सोन्याचा चमचा घेऊन राजकारणात आले नाहीत, असा टोला शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाकरे यांना उद्देशून मारला होता. तो संर्दभ घेत ठाकरे यांनी दानवे हे जरी सोन्याचा चमचा घेऊन राजकारणात आले नसले तरी नंतर त्यांच्या समोर आलेल्या सोन्याने भरलेल्या ताटाला बघून पक्षाशी प्रतारणा केली नाही. इतरांप्रमाणे ते दुसऱ्या उपहारगृहात मध्येे जेवायला गेले नाहीत, असा प्रति टोला ठाकरे यांनी हाणला. पूर्वी भाजपचे असलेले दानवे आम्हाला दिल्याबद्दल मी फडणवीस यांना धन्यवाद देईन पण आमच्या घेतलेल्या आमदारांबद्दल फडणवीस आमचे आभार मानतील का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या निरोप समारंभापूर्वी प्रवेश करताना फडणवीस व ठाकरे हे समोरासमोर आले. तेव्हा उभयतांनी परस्परांशी हस्तालोंदन केले. फडणवीस यांनी दिलेल्या निमंत्रणाबद्दल उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले असता त्यांनी अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात. खेळीमेळीने घ्यायच्या असतात, असे उत्तर दिले. ‘आमच्यातून घेतलेले बहुधा त्यांनी जड झाले असावे, अशी मिश्कील टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी केली.