सत्तास्पर्धेतील धुसफूस, अंतर्गत नाराजी आणि दावेदारीस पूर्णविराम देऊन विधिमंडळ भाजपने नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मंगळवारी एकमुखाने मोहोर उमटवली. देवेंद्र फडणीस हे येत्या शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला अद्याप काही आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असली तरी सध्या अल्पमतातील सरकार स्थापण्याचाच निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी फडणवीस यांच्यासोबत मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणारी १८वी व्यक्ती असतील. तर वयाच्या ४४ व्या वर्षी हा मान मिळवून ते राज्यातील दुसरे तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा दिवसांनी भाजपची नेतानिवडीची बैठक विधानभवनात पार पडली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, सरचिटणीस जे.पी. नड्डा, राजीव प्रताप रुडी, ओम माथूर या निरीक्षकांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता ही बैठक सुरू झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचे नाव सुचविले आणि विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या नावास अनुमोदन दिले. त्याला सर्वानी एकमताने पाठिंबा दिला. बैठकीतील निर्णय जे.पी. नड्डा यांनी घोषित केला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील अनेक खासदार, विधानपरिषद सदस्यही या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदासाठी पक्षातील काही इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या पाठबळामुळे फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मार्गावरील सारे काटे दूर झाले. बैठक झाल्यावर फडणवीस यांनी राजनाथसिंह व नड्डा यांच्यासह प्रदेश नेत्यांशी विचारविनिमय केला. त्यानंतर सायंकाळी राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा करण्यात आला. भाजपचे १२२ आणि अन्य पक्ष व अपक्षांचा पाठिंबा गृहीत धरता भाजप सरकारला १३७ आमदारांचे पाठबळ असून, बहुमतासाठी मात्र १४५ इतके संख्याबळ आवश्यक आहे.
गडकरी, खडसे समर्थक थंड
फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर होते, तरीही एकनाथ खडसे, नितीन गडकरी यांची नावेही चर्चेत होती. गडकरी यांनी मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह विदर्भातील ४० आमदारांनी केला होता. पण अध्यक्ष अमित शहा आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून कानपिचक्या मिळाल्यावर गडकरी समर्थकांचे मनसुबे थंड झाले. तर खडसे यांनी या शर्यतीत असल्याचे स्वत:हून जाहीर केले होते. मात्र, संघाचे पाठबळ, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि तरुण चेहरा यांमुळे फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2014 रोजी प्रकाशित
सिंहासनी देवेंद्र!
सत्तास्पर्धेतील धुसफूस, अंतर्गत नाराजी आणि दावेदारीस पूर्णविराम देऊन विधिमंडळ भाजपने नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मंगळवारी एकमुखाने मोहोर उमटवली.
First published on: 28-10-2014 at 04:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis will be new chief minister of maharashtra