मुंबई : चौपाटी जवळ नावावर सदनिका असूनही सरकारी बंगला सोडण्यास धनंजय मुंडे हे टाळाटाळ करीत असल्याबाबत ‘लोकसत्ता’च्या बातमीवरून चोहोबाजूने टीका सुरू होताच सदनिकेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार असल्याचे मुंडे यांनी बुधवारी स्पष्ट केले.

‘चौपाटीवर घर असूनही धनंजय मुंडे सरकारी बंगल्यात’ या आज प्रसिद्ध झालेल्या बातमीवर संतप्त प्रतिक्रिया उमटली. मंत्रिपद जाऊन पाच महिने झाले तरी मुंडे यांचे एवढे लाड का, असा सवाल केला जात आहे. या संदर्भात मुंडे यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

‘मुंबईतील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत. मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यायोग्य नसून, त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणे गरजेचे आहे. या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे, माझा शोधही सुरु आहे. सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार आहे. तशी शासनाकडे विनंती केली आहे’, असे मुंडे यांनी म्हटले आहे. सरकारी बंगला कधी सोडणार याची कालमर्यादा किंवा तारीख मुंडे यांनी दिलेली नाही. यामुळे चौपाटीजवळ सदनिका असूनही मुंडे आणखी किती काळ सरकारी बंगल्यात राहणार हा प्रश्न कायम आहे.

धनंजय मुंडे यांना निवासस्थान संदर्भात लागलेला ४६ लाखांचा दंड राज्य सरकार माफ करणार आहे. गरिबांना एक आणि श्रीमंतांना दुसरा न्याय हे महायुती सरकारचे धोरण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहीत पवार यांनी केली.

मुंबईत तीन सदनिका , विभक्त पत्नीचा आरोप

धनंजय मुंडे यांच्या मलबार हील, सांताक्रूझ आणि पवई अशा मुंबईत तीन सदनिका आहेत. पैकी पवईच्या सदनिकेमध्ये मी राहते आहे. मुंडे हे शासकीय निवासस्थान सोडण्यासंदर्भात दिशाभूल करत आहेत. त्यांना भाड्याने घर मिळत नसेल तर त्यांनी मी राहात असलेल्या पवईच्या सदिनकेत राहण्यास यावे. मुलींच्या शिक्षणाचे व आजाराचे ते जे कारण देत आहेत, ते जनप्रतिनिधीला शोभणारे नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांच्या विभक्त पत्नी करुणा मुंडे यांनी व्यक्त केली.

भाड्याने ७२ सदनिका उपलब्ध – अंजली दमानिया

धनंजय मुंडे यांनी मलबार हील परिसरात भाड्याने घर मिळत नसल्याचे म्हटले आहे. पण, भाड्याने घर देणाऱ्या पोर्टलवर या परिसरात ७२ सदनिका भाड्याने उपलब्ध आहेत. मुंडे यांची सदिनका ज्या ‘वीरभवन’ इमारतीमध्ये आहे, तेथेही भाड्याने सदनिका उपलब्ध आहे. मुंडे यांनी दिलेले आजाराचे कारण खोटे आहे. ‘बेल्स पाल्सी’ आजार चार आठवड्याचा असतो. मुंडे आजारी आहेत तर मग सभांमध्ये भाषणे कशी करतात? त्यांच्यावर शासकीय बंगल्याचा दंड ४६ लाखांवर गेला असून सरकारने तो माफ करता कामा नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अजंली दमानिया यांनी केली. तसेच मुंडे यांना सरकारी निवासस्थान ४८ तासांत रिक्त करण्यास सांगावे, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.