मुंबई: बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती, आर्टी या संशोधन व प्रशिक्षण संस्थांच्या वतीने स्पर्धा परीक्षा व कौशल्य अधारित प्रशिक्षण कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) घेण्यात येते. मात्र त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करताना ‘भटक्या जमाती-क’ प्रवर्गात पोटजात ‘धनगर’ येत नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अर्ज सादर करताना ‘भटक्या जमाती -क’समोर पोटजातीचा पर्याय द्यावा लागतो. तिथे धनगर समाजातील बंडगर, सनगर, अहीर, खुटेकर आदी २९ पोटजाती आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भटक्या जमाती -क प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्रावर ‘हिंदु धनगर’ असा उल्लेख आहे. अर्जामध्ये पोटजातीच्या पर्यायामध्ये ‘हिंदु धनगर’ हा पर्यायच दिलेली नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे अर्ज बाद ठरण्याची भीती आहे.
या परीक्षेचे नियाेजन ‘महाज्योती’ संस्थेने केले आहे. सदर संस्था इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नियंत्रणात आहे. यासंदर्भात ‘महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच’ने विभागाचे मंत्री अतुल सावे यांना सोमवारी निवेदन देण्यात आले आहे. ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर सुधारणा करण्यात यावी आणि परीक्षा अर्ज सादर करण्यास मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मंचचे प्रवक्ते बिरु कोळेकर यांनी केली आहे.