धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खासगी क्षेत्राच्या साह्याने पुनर्विकास करण्यास नुकताच हिरवा कंदील दाखवला असताना धारावीच्या पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. बिश्वास परदेशी प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे आता धारावीच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्राधिकरणाला कर्णधारच नाही, अशी अवस्था झाली आहे.
धारावीचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे. मागच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी या प्रकल्पासाठी जागतिक निविदा मागवण्यात आल्या. पण २००८ च्या जागतिक मंदीचा परिणाम म्हणून ती प्रक्रिया अपयशी ठरली. त्यानंतर २०१० मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी एका सेक्टरचे काम ‘म्हाडा’ला देण्याचे ठरले. त्यानुसार सेक्टर पाचचे काम ‘म्हाडा’ला देण्यात आले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी धारावीच्या इतर सेक्टरचा विकास खासगी क्षेत्राच्या साह्याने करण्याबाबत हिरवा कंदील दाखवला.
आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी धारावी प्रकल्पाचे गाडे मार्गी लागावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या धारावीच्या पुनर्विकास प्राधिकरणाची भूमिका, कारभार महत्त्वाचा ठरणार आहे. अशावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले बिश्वास यांना सेवांतर्गत परदेशी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे कर्णधाराशिवाय प्राधिकरणाचा गाडा जलदगतीने आणि प्रभावीपणे कसा काय हाकला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी प्रकल्पाच्या कामाला याचा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे.