मुंबई : मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मधुमेहाला प्रतिबंध करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजन करण्याबरोबरच नागरिकांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येत आहे. मागील तीन वर्षांमध्ये राज्यात मधुमेहाची तपासणी करण्याचे प्रमाण जवळपास ३५ टक्क्यांनी वाढले आसार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिलेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षांमध्ये मधुमेहाची तपासणी करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये ५२ लाख ५२ हजार ३८ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये १३ लाख ६९ हजार ६६७ रुग्णांना मधुमेह असल्याचे आढळले. हे प्रमाण तपासणी केलेल्या नागरिकांच्या तुलनेत २६ टक्के इतके होते.

मात्र राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमुळे २०२४-२५ मध्ये तपासणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. २०२४-२५ मध्ये १ कोटी ४६ लाख ५७ हजार ६७० नागरिकांची सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. यातील २२ लाख ३७ हजार ५८६ नागरिकांना मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले. हे प्रमाण एकूण तपासणी केलेल्या नागरिकांच्या तुलनेत १५.२६ टक्के इतके होते. २०२५-२६ मध्ये ऑक्टोबरपर्यंत १ कोटी ५० लाख ७९ हजार ८५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून यापैकी २८ लाख ५५ हजार ७०९ नागरिकांना मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले. हे प्रमाण एकूण तपासणी केलेल्या नागरिकांच्या तुलनेत १९ टक्के इतके आहे. यावरून मागील तीन वर्षांमध्ये राज्यामध्ये मधुमेहाची तपासणी करण्याचे प्रमाण जवळपास ३५ टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले.

या तपासणीदरम्यान सापडलेले मधुमेहाचे रुग्ण नियमित तपासणीसाठी येत असून तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. २०२३-२४ मध्ये आढळलेल्या १३ लाख ६९ हजार ६६७ रुग्णांपैकी १ लाख ४५ हजार ३४६ रुग्ण नियमित तपासणी करीत आहेत. त्याचप्रमाणे २०२४-२५ मध्ये सापडलेल्या २२ लाख ३७ हजार ५८६ रुग्णांपैकी ४ लाख १ हजार ४४५ रुग्ण नियमित तपासणी करीत आहेत. तर २०२५-२६ मध्ये आढळलेल्या २८ लाख ५५ हजार ७०९ रुग्णांपैकी ४ लाख १२ हजार ७६६ रुग्ण नियमित तपासणी करीत आहेत.

जनजागृतीवर भर देणार

जागतिक मधुमेह दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहीम, व्याख्याने आणि आरोग्य परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांना मधुमेहाविषयी जागरूक करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.