शैलजा तिवले

ताप, सर्दी, खोकला, दम लागणे ही करोनाची सर्वसाधारण लक्षणे न दिसता केवळ डोळ्यांशी संबंधित लक्षणे असलेल्या अनियंत्रित मधुमेहींना करोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. वेळेत निदान न झाल्याने यातील जवळपास १५ टक्के रुग्णांना दृष्टी गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराची लक्षणे आधी दिसून आली आणि त्यानंतर करोनाचे निदान झाले.

केईएम रुग्णालयात गेल्या सात महिन्यांत  मधुमेहाचे ५० रुग्ण डोळे लाल होणे, सूज येणे, दृष्टी कमी होणे अशी लक्षणे घेऊन आले. या रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य संसर्ग  झाला होता. परंतु त्याच वेळी केलेल्या करोना चाचणीत त्यापैकी सुमारे ९४ टक्के रुग्ण करोनाबाधित असल्याचे आढळले आहे.

अनियंत्रित मधुमेहींमध्ये शरीरातील साखरेची पातळी कमी होते. यामध्ये अ‍ॅसिडची पातळीही कमी होते. ही स्थिती बुरशीच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य संसर्ग आढळतो. दर महिन्याला असा एखादा रुग्ण रुग्णालयात येत असतो. परंतु गेल्या काही महिन्यांत हे प्रमाण ६० ते ७० टक्के  वाढले असून यात करोनाबाधितांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यातील काही रुग्णांमध्ये वास जाण्याव्यतिरिक्त कोणतीही करोनाची सर्वसाधारण लक्षणे नव्हती, असे केईएम रुग्णालयांचे नाक, कान आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत म्हशाळ यांनी सांगितले.

‘म्युकरमायकोसिस’चा संसर्ग बहुतांश रुग्णांमध्ये करोनाची बाधा झाल्यानंतर आढळला आहे, तर काही रुग्णांमध्ये करोनाचे उपचार सुरू असताना झाल्याचे दिसून आले आहे. परंतु अनियंत्रित मधुमेही रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे न दिसता म्युकरमायकोसिसच्या संसर्गाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे हा संसर्ग हेदेखील करोनाचे आणखी एक लक्षण असल्याचे यावरून स्पष्ट होते. यातील बहुतांश रुग्ण हे ५० वर्षांवरील होते. यातील काही रुग्णांमध्ये निदान उशिराने झाले.

शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक

नाकाच्या वरच्या बाजूस मृतपेशींवर ही बुरशी वाढते. ती शस्त्रक्रियेद्वारे काढावी लागते. करोनाबाधित रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये आधी बुरशी नष्ट  करणारी (अ‍ॅण्टीफंगल) औषधे देतो. रुग्ण करोनामुक्त झाल्यावर शस्त्रक्रि या केली जाते. बुरशी न काढल्यास पुन्हा वाढण्याचा धोकाही असतो. हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी सहा ते आठ आठवडे औषधोपचार घ्यावे लागतात. ही औषधे महाग असतात. तसेच या औषधांचेही काही दुष्परिणामही असतात.

तातडीने चाचण्या होणे आवश्यक : म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये डोळ्यांशी संबंधित लक्षणे होती. तेव्हा वेळेत निदान आणि उपचार करण्यासाठी डोळ्यांना सूज येणे, लाल होणे, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यांतून पाणी येणे अशी लक्षणे आढळलेल्या मधुमेहींनी तातडीने करोना चाचणीसह डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे डॉ. म्हशाळ यांनी व्यक्त केले.