मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकेतील दहिसर पूर्व – काशीगाव दरम्यानच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्यांना काही दिवसांपूर्वीच सुरुवात केली आहे. आता या मार्गिका प्रत्यक्ष वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या दोन्ही मार्गिकांवरील पहिल्या टप्प्यातील प्राथमिक निरीक्षणास सुरुवात झाली आहे.
मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) दिल्ली यांचे एक पथक मुंबईत दाखल झाले असून हे पथक तीन दिवसांमध्ये ‘मेट्रो २ ब’ आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकांवरील पहिल्या टप्प्यातील मार्गिकांचे निरीक्षण करणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्याने आता लवकरच डायमंड गार्डन – मंडाळे आणि दहिसर – काशीगाव मेट्रो प्रवासाचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मेट्रो गाड्यांच्या चाचण्या आधीच सुरू
एमएमआरडीएच्या १४ मेट्रो मार्गिकांच्या प्रकल्पातील ‘अंधेरी पश्चिम – मंडाळे मेट्रो २ ब’ आणि ‘दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९’ मार्गिकांचे काम वेगात सुरू आहे. राज्य सरकारने येत्या दोन वर्षांत किमान १०० किमीचे जाळे वाहतूक सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएला दिले आहे. त्यानुसार एमएमआरडीएने डिसेंबरच्या आत ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड – मंडाले दरम्यानचा पहिला टप्पा, तर ‘मेट्रो ९’ मार्गिकेतील दहिसर पूर्व – काशीगाव दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाप्रमाणे डायमंड गार्डन – मंडाले मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांच्या चाचणीस १६ एप्रिलपासून एमएमआरडीएने सुरुवात केली. तर ‘मेट्रो ९’ मार्गिकेतील दहिसर पूर्व – काशीगाव या पहिल्या टप्प्यातील मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना १४ मेपासून सुरुवात झाली. नियमितपणे या चाचण्या सुरू असून आता या दोन्ही मेट्रो मार्गिकांचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने आणखी एका महत्त्वाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
सुरक्षा प्रमाणपत्र अत्यावश्य
कडायमंड गार्डन – मंडाले आणि दहिसर पूर्व – काशीगाव हे टप्पे वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी सीएमआरएसकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेस अखेर आता सुरुवात झाली आहे. कोणतीही मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने सुरक्षा प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानुसार सीएमआरएसचे एक पथक बुधवारी मुंबईत दाखल झाले असून या पथकाने दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील पहिल्या टप्प्याच्या प्राथमिक निरीक्षणास सुरुवात केल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. हे पथक शुक्रवारपर्यंत निरीक्षण करणार असून त्यानंतर सीएमआरएसच्या प्रत्यक्ष चाचण्यांना सुरुवात होणार आहे. सीएमआरएस चाचण्या यशस्वी होऊन सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास दोन्ही मेट्रो मार्गिकांचा पहिला टप्पा प्रत्यक्ष वाहतूक सेवेत दाखल होईल.