महाविकास आघाडीत धुसफूस, शिवसेनेवर नाराजी : निर्णयाची पूर्वकल्पना नसल्याचा राष्ट्रवादी, काँग्रेसचा आक्षेप

टाळेबंदी हा शब्दच हद्दपार करायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार सांगत असले तरी याच मुद्दय़ावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. टाळेबंदीच्या मुदतवाढीबाबत पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा आक्षेप आहे. मुंबईत दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर न फिरण्याचा निर्णय घेताना गृहमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आल्याबद्दलही राष्ट्रवादीमध्ये नापसंती व्यक्त करण्यात आली आहे.

टाळेबंदीची मुदत वाढविण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन मित्रपक्षांमध्ये सुरुवातीपासूनच मतमतांतरे होती. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ापासून राज्यातील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करावेत, अशी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भूमिका होती आणि काँग्रेसचा त्याला पाठिंबा होता. जून महिन्यात राज्यातील व्यवहार सुरू करावेत, यासाठी पवारांनीच पुढाकार घेतला होता. त्यानंतरच राज्याने ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ (मिशन बिगिन अगेन) ही मोहीम सुरू केली.

टाळेबंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरूवातीपासूनच सावध पवित्रा घेतला. राज्यात टाळेबंदीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्याच्या निर्णयाची राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कल्पना देण्यात आली नव्हती. तसेच गेल्या रविवारी मुंबईत दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर न फिरण्याची अट पोलिसांनी लागू केली. त्यातच अंतरनियमासह इतर नियमांची अंमलबजावणी करत पोलिसांनी हजारो वाहने जप्त केली. या साऱ्या प्रकारांवर संतप्त प्रतिक्रि या उमटली. भाजपने सरकारच्या या निर्णयावर टीका केली. विशेष म्हणजे पोलिसांनी ही कारवाई के ली असली तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही पूर्वकल्पना नव्हती. याबद्दल राष्ट्रवादीत तीव्र प्रतिक्रि या उमटली आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील सर्व शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्याच्या निर्णयावरही राष्ट्रवादीचा आक्षेप होता. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात यावरून मतभेद झाल्याचे समजते. ठाण्यापेक्षा पुणे शहरात रुग्णांची संख्या जास्त असली तरी पुण्यात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाणार नाही. टाळेबंदीच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच भूमिका घेतली होती. मुंबई, ठाण्यातील सारे व्यवहार अडीच महिने पूर्णपणे बंद होते, पण पुण्यात अजित पवारांनी दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप नोंदवला होता. मेहता यांच्या सल्ल्याने मुख्यमंत्री निर्णय घेतात व त्यातून अधिक गोंधळ निर्माण होतो, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्या वेळी टाळेबंदीवर चर्चा होईल, असे सांगण्यात आले.

निकष, निर्णय अनाकलनीय

राज्यात स्थानिक पातळीवर एकापाठोपाठ एक निर्बंध लागू करण्याचे आदेश काढण्यात येत आहेत. त्याचे निकष आणि निर्णय सारेच अनाकलनीय आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील टाळेबंदीबाबत महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळे आदेश काढण्यात आले. त्यामुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात गुरुवारी सकाळपासून तर उल्हासनगर शहरात सायंकाळपासून टाळेबंदीची अंमलबजावणी सुरु झाली. कल्याण ग्रामीण, अंबरनाथ ग्रामीण, भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड भागात गुरुवारी रात्री १२ पासून टाळेबंदी लागू करण्यात आली. नवी मुंबई शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून टाळेबंदी लागू होणार आहे. भिवंडी आणि अंबरनाथ पालिका क्षेत्रात काही दिवसांआधीच निर्बंध लागू करण्यात आले. अगदी एकमेकांना खेटलेल्या या शहरांत वेगवेगळ्या तारखांना निर्बंध का लागू झाले आणि त्यातील अनेक शहरांमध्ये नियमांमध्येही तफावत का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांत राज्य परिवहन महामंडळासह सर्वच परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांची सेवा बंद असेल, असे पोलिसांच्या आदेशात म्हटले होते. प्रत्यक्षात गुरूवारी शहरात बससेवा सुरु होती.

मुंबईत वाहने जप्त करण्याकडे कल

मुंबईत याआधी मर्यादित वेळेसाठी असलेली संचारबंदी बुधवारपासून २४ तास लागू करण्यात आली. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि इतरांना दिलेली परवानगी वगळता ‘विनाकारण’ भटकणाऱ्यांवर कारवाई होईल, असे पोलिसांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, संचारबंदीच्या या नव्या नियमांच्या अंमलबजावणीबाबत पोलीस फारसे आग्रही नव्हते. त्याऐवजी मुंबईत गुरुवारी पोलिसांचे सर्व लक्ष वाहने जप्त करण्याकडे होते. उत्तर मुंबई वगळता उर्वरित शहराच्या प्रत्येक भागातल्या रस्त्यांवर, गल्लीबोळात गर्दी होती. नागरिकांना थांबवून चौकशी केली जात असल्याचे चित्र कुठेही दिसले नाही. याबाबत विचारले असता ‘रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी काटेकोरपणे राबवतो’, असे काही पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी सांगितले.

सध्या नऊ रुग्ण असलेल्या बीडमध्ये टाळेबंदी

सुमारे तीन हजार उपचाराधीन रुग्ण असलेल्या औरंगाबादमध्ये सध्या टाळेबंदी नाही. पण, सध्या केवळ नऊ रुग्ण असलेल्या बीडमध्ये गुरुवारपासून ९ जुलैपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या चारही जिल्ह्य़ांत टाळेबंदी शिथिल केल्यानंतर रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मात्र, तिथे अद्याप तरी निर्बंधांचा निर्णय घेतलेला नाही.

मुंबई, ठाण्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काही निर्बंध आवश्यकच आहेत. पण, त्याची अंमलबजावणी करताना सामान्य जनतेला त्रास होऊ नये, ही काँग्रेसची भूमिका आहे. मुंबईत दोन किलोमीटरच्या परिघातच फिरण्याची अट कोणतीही पूर्वसूचना न देता लागू करण्यात आली. त्यामुळे अनेकजण नाहक भरडले गेले. निर्णय घेताना लोकांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार नाही, याचीही सरकारने खबरदारी घ्यावी.

– सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते