मुंबई : सामान्यतः खाजगी रुग्णालयांमध्ये लाखोंचा खर्च येणाऱ्या गुडघ्याच्या दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया आता ठाणे जिल्हा रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडत आहेत. गुरुवारी एका २४ वर्षीय तरुणावर जिल्हा रुग्णालयात गुडघ्याची अवघड आणि जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
ओडिशातील मूळचा रहिवासी अजय (वय २४, नाव बदलून) पाच वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी अपघातात गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून पायात सतत वेदना होत होत्या. सध्या तो कामानिमित्त ठाण्यात राहत आहे. काही दिवसांपूर्वी पाय अधिक दुखू लागल्याने त्याने ठाणे जिल्हा रुग्णालय गाठले. तपासणीनंतर एक्स-रे व एमआरआय चाचण्यांतून अजयच्या गुडघ्याची एक लिगामेंट पूर्णपणे तुटलेली असून, गादी (मेनिस्कस) फाटलेली असल्याचे निष्पन्न झाले. ही स्थिती गंभीर आणि तांत्रिकदृष्ट्या जटिल होती अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आणि अस्थीव्यंग तज्ज्ञ डॉ. धीरज महांगडे यांनी दिली.
गुढघ्याची लिगामेंट आणि गादी पुन्हा पहिल्यासारखी करणे काहीशी आव्हानात्मक गोष्ट होती. त्यामुळे डॉक्टरांनी अजयवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. अजयच्या गुडघ्यात नवीन लिगामेंट बसवण्यात आली असून, फाटलेली गादी देखील पूर्वव्रत करण्यात आली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी अतिरिक जिल्हा शल्य चिकीत्सक आणिअस्थिव्यंग तज्ज्ञडॉ. धीरज महांगडे, डॉ. मोहन मुराडे, डॉ. दीपेश पाटील, डॉ. प्रियंका महांगडे, डॉ. रुपाली यादव, जागृती गायकर मिलिंद दौंडे, रत्नाकर ठाकरे आदींनी अथक परिश्रम घेतले.
गुढघ्याची शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात केली असती, तर त्याचा खर्च लाखोंमध्ये गेला असता. मात्र, सिव्हिल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे अजयला मोफत व प्रभावी उपचार मिळाले. जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया अधिक प्रभावीपणे रुग्णांसाठी करता येतील,असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.