मुंबई : फलटण येथील भाजप नेते दिगंबर रोहिदास अगवणे यांना उच्च न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नुकताच जामीन मंजूर केला.सक्तवसुली संचालनालयाने अगवणे यांना ५ जानेवारी २०२४ रोजी अटक केली होती.

तेव्हापासून ते कारागृहात होते. त्यांच्यावर बँका, सहकारी पतसंस्था आणि व्यक्तींशी संबंधित अनेक फसवी कर्ज व्यवहार व आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता.

या प्रकरणाची चौकशी आधीच पूर्ण झाली. त्यामुळे, अगवणे यांना आणखी कारागृहात ठेवून कोणताही उद्देश साध्य होणार नाही. याशिवाय, या प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. तसेच, ईडीने सादर केलेले पुरावे प्रामुख्याने दस्तऐवजी स्वरूपाचे आहेत. पुरावे बहुसंख्येने दस्तऐवजी आणि सुरक्षित स्थितीत असतात, तेव्हा ते नष्ट करण्याची शक्यता अत्यल्प असते, असे न्यायालयाने अगवणे यांना जामीन मंजूर करताना स्पष्ट केले.

मालमत्ता मूल्यांकन व दुहेरी गहाण ठेव यासंबंधीचे आरोप हे तज्ज्ञांनी तपासायचे मुद्दे आहेत आणि ते केवळ खटल्याच्या सुनावणीदरम्यानच ठरवले जाऊ शकतात. तसेच, गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब आणि सूड उगवण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आल्याचा अगवणे यांचा दावाही न्यायालयाने अगवणे यांना दिलासा देताना विचारात घेतले.